|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » फडणवीसांची सत्त्वपरीक्षा

फडणवीसांची सत्त्वपरीक्षा 

ज्येष्ठ नेते शरद पवार पत्रकार परिषद घेण्यासाठी आले आहेत आणि तत्पूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत त्यांना भेटून गेले, त्यातही एकच दिवस आधी पवार दिल्लीहून सोनिया गांधी यांची भेट घेऊन परतले म्हटल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित सत्ता महाराष्ट्रात आणण्याची घोषणा पवार करतात की काय हे जाणून घेण्यास महाराष्ट्र उत्सुक असतानाच पवारांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला असून ज्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्या इतपत संख्याबळ आहे त्या भाजप-शिवसेनेने पुढे येऊन सत्ता स्थापन करावी, आम्हाला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून कार्य करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. विश्वासाच्या तुटलेल्या दोरीला पुन्हा ओढून ताणून जोडू पाहणाऱया शिवसेना-भाजपला अडचणीत आणून सोडले. त्यातही सर्वात मोठी अडचण केली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची! महाराष्ट्राच्या राजकारणात ते एकटे असल्याचा प्रचार त्यांचेच निकटवर्तीय करत आहेत. त्यात दिल्लीतून ज्यांनी साथ द्यायची ते अमित शहा महाराष्ट्रात यायला आणि शिवसेनेशी पुन्हा शिष्टाई करायला तयार नाहीत. पंतप्रधानांना व्यस्ततेमुळे वेळ देता आलेला नाही. कोंडी फोडण्यासाठी आशेने पाहिले जात आहे, ते नितीन गडकरी आधीच दुखावले असल्याने मध्यस्थीस अनुकूल नाहीत. संघाच्या मुख्यालयातूनही तोडगा काही दृष्टिपथात आलेला नाही. एकच दिवस आधी राज्यातील विजयी, पराभूत आणि निवडणुकीवेळी डावललेल्या भाजप नेत्यांना एकत्र आणून आम्ही फडणवीस यांच्या पाठीशी आहोत, पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील असे वदवून घेतले तरीही त्याचा परिणाम शिवसेनेवर झालेला नाही. उलट जोपर्यंत मुख्यमंत्रीपद सेनेला देण्याबाबत लिखित स्वरूपात काही दिले जात नाही तोपर्यंत चर्चेत आणि इतर सत्तापदात स्वारस्य नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 9 तारखेला सरकारचा कार्यकाल संपणार आहे. त्यापूर्वी राज्य स्थापन करायचे आणि शपथविधी उरकून घ्यायचा तर पुरेसे पाठबळ नाही. सरकार कोसळण्याचा धोका, अशा विचित्र कोंडीत फडणवीस सापडले आहेत. त्यातून गेली पाच वर्षे ज्यांचा ज्यांचा कोंडमारा झाला त्या सर्वांनी संधी साधून घेण्यास सुरूवात केलेली आहे. अगदी फडणवीस यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही उकळय़ा फुटू लागलेल्या आहेत. डावललेले नेते तर खूश आहेतच पण सत्तेच्या तक्ताखाली दबून शांत राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाही कंठ फुटू लागला आहे. त्यांच्या वक्तव्यातून वातावरण अधिकच गोंधळाचे होऊन तिढा सुटण्याऐवजी गुंता अधिक वाढत चालला आहे. परिणामी सत्ता राखायची असेल तर मुख्यमंत्री बदलण्याची ऑफर पुढे ठेवावी, गडकरी यांना राज्यात आणून फडणवीस यांना केंद्रात पाठवावे आणि शिवसेना तसेच शरद पवार यांच्याशी जमवून घेण्याच्या वाटाघाटी करण्यात याव्यात असाही सूर उमटत आहे. दुसरीकडे मुख्यालयात आल्यानंतरही संघाची भूमिका स्पष्ट झालेली नाही. भाजप शब्द पाळणारा पक्ष आहे अशीच प्रतिमा असली पाहिजे अशी पक्षांतर्गत आणि संघामध्येही चर्चा आहे. शिवसेना मात्र परतीचे दोर कापलेले आहेत, मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे मिळणार नसेल तर आम्ही सत्तेत येणार नाही, आमच्याकडे मॅजिक फिगर आहे असे वारंवार सांगत आहे. याच म्हणण्याला पुढे रेटत शरद पवार यांनी जनादेशाप्रमाणे सत्ता स्थापन करण्याचे आवाहन केलेले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ही निवडणूक आघाडी करून लढवलेली असल्याने पुढचा जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही एकत्रितच घेऊ अशी पुस्तीही पवार यांनी जोडली आहे. काँग्रेस अंतर्गत शिवसेनेला साथ देणे किंवा सत्ता स्थापनेत सहभागी होण्याबाबत एकवाक्यता नाही हे ते पुरते जाणतात. त्यामुळे त्या निर्णयापर्यंत येण्यास त्यांनी काँग्रेसला पुरेसा वेळ मिळेल असे पाहिले आहे. दुसरीकडे घाईने भाजपने शपथविधी घेतला आणि सेनेने हात खेचला तर अपश्रेय आपल्या डोक्मयावर फुटू नये याची खबरदारी घेतली आहे. आपल्या पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्यास त्यांनी परवानगी देऊ केली होती. ज्यावेळी पाटील यांनी शिवसेनेला पूर्ण सहकार्य असेल. दोन्ही काँग्रेसचे कोणीही आमदार फुटणार नाहीत आणि जर त्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचा एकच उमेदवार विरोधात उभा करू असे सांगून भाजपच्या फोडाफोडीच्या मनसुब्यालाही सुरूंग लावून ठेवला आहे. जयंत पाटील यांचीच री ओढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही तसेच वक्तव्य केले आहे. निवडणुकीआधी दोन्ही काँग्रेस फोडणाऱया भाजपला शह देत त्यांचा सत्ता स्थापनेला उपयुक्त ठरणारा मित्रपक्षच फोडण्याची ही रणनीती आहे आणि त्यासाठी पुरेसा वेळ देण्याचीही, तोपर्यंत शांत राहून सर्व खेळ पाहण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी दाखवून दिलेले आहे. अशा स्थितीत आता भाजपला आपण केलेल्या चुका आठवत असतील. पक्षातील दिग्गजांना घरी बसवणे, मित्रपक्षांशी शब्दच्छलाचा डाव खेळणे, शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर विरोधकाला पुरेसी तयारी नसताना घेरायला जाणे हे सर्व त्यांच्या अंगलट आले आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही आपल्या मित्रपक्षाला अडचणीत आल्यानंतर घाव घातले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता आणि तो पाळलाच पाहिजे या मुद्यापासून ते मागे येण्यास तयार नाहीत. पाच वर्षे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कोंडी झाली होती. आता जनतेने त्यात थोडासा सुधार केला. परिणामी राज्यात सर्वात अडचणीत कोण सापडले असतील तर ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! आजपर्यंत अनेक संकटातून त्यांनी वाट काढली आहे. पण, आज आकडे त्यांच्या बाजूने नाहीत म्हटल्यावर सगळेच विरोधात उभे आहेत. आता या सत्त्वपरीक्षेत ते कसे वागतात हे पहायचे.

Related posts: