|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाफ्ता जहाजामुळे सरकारचा बेजबाबदारपणा उघड

नाफ्ता जहाजामुळे सरकारचा बेजबाबदारपणा उघड 

मुख्यमंत्री अकार्यक्षम असल्याचा चोडणकर यांचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

दोनापावला येथे अडकून पडलेला नुसी नलीनी जहाजामुळे सरकारचा कारभार पूर्णपणे उघडा पडला आहे. सरकार किती बेजबाबदार आहे व मुख्यमंत्री किती अकार्यक्षम आहेत हे या नाफ्तायुक्त जहाजाने सिद्ध केले आहे, अशी जहरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. मागील 14 दिवस सरकार या नाफ्तावाहू जहाजाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकलेले नाही. सरकारने सहा लाख लोकांचे जीवन पणाला लावल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला आहे.

मागील 14 दिवस हे नाफ्ता भरलेले जहाज दोनापावला येथे अडकून पडले आहे. या जहाजाबाबत मुख्यमंत्र्यांनी एमपीटी अधिकाऱयांसोबत बैठका घेतल्या. या जहाजातील नाफ्ता तीन दिवसात हटविला जाणार असे अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुढे मुख्यमंत्री तारखा देत गेले. हायड्रोलिक पंप बसविणार, युएईतून जहाज येणार, अशा अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. पण यापैकी एकही गोष्ट झालेली नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री आपल्या विधानावर कुठेही स्थिर राहीलेले नाहीत. आता सिंगापूर येथील कंपनी नाफ्ता काढण्यासाठी येणार हे मुख्यमंत्री सांगत आहेत. पंतप्रधान मेक ईन इंडियाचा नारा लावतात व जहाजातील  नाफ्ता काढण्यासाठी सिंगापूर येथून यंत्रणा आणावी लागते हे दुर्देव आहे. भारतात नाफ्ता खेचण्याचे कामही होऊ शकत नाही. हेच यातून सिद्ध झाले आहे. यामुळे मेक ईन इंडियाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाराही फोल ठरला आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे, खांडेपार येथे फुटलेली जलवाहिनी याबाबत सरकारने दिलेली आश्वासने अशीच फोल ठरली. यातून मुख्यमंत्री किती अकार्यक्षम आहेत हे स्पष्ट झाले होते. आता नाफ्तावाहू जहाजाने तर यावर शिक्कामोर्तब केले आहे. या जहाजातील नाफ्ता अत्यंत घातक आहे. स्फोटक गोष्टीबाबत काही मार्गदर्शक तत्वे असतात. त्याची मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वास्को येथे झालेल्या नाफ्ता गळतीचे परिणाम मुख्यमंत्र्यांना महिती नाहीत काय ? त्याचे गंभीर परिणाम झाले. या जहाजातील नाफ्ताबाबत तोच प्रकार घडला. तर त्याचे महाभयंकर परिणाम होऊ शकतील. समुद्रात नाफ्ता पसरल्यास किनारी भागातील सुमारे सहा लाख लोकांवर त्याचा परिणाम होईल. आता खुद्द मुख्यमंत्रीच सांगतात की स्थिती आपत्तीजनक ठरू शकते. 14 दिवस सरकारला याबाबत कोणताही ठोस निर्णय घेता आलेला नाही.

नाफ्ता गळती झाल्यास जलसंपत्तीवर काय परिणाम होईल. पाण्यात आग लागल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकारने कोणता निर्णय घेतला आहे. मानवी जीवनावर किती गंभीर परिणाम होतील, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.

मिलींद नाईक यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतात

मंत्री मिलींद नाईक यांचा या जहाजाशी संबंध नाही हे मुख्यमंत्री ठामपणे सांगतात. हे जहाज कुणी आणले, का आणले व आणणाऱयाविरोधात तक्रार दाखल करायचे सोडून उलट मुख्यमंत्री क्लीन चीट देतात. हे जहाज पाकिस्तानातून आले आहे. मुळात ही कृतीच देशद्रोहीपणाची आहे. एमपीटी चेअरमन विरोधात तक्रार दाखल व्हायला हवी होती. मात्र तक्रार केली जात नाही. कारण तक्रार केल्यास या जहाजाबाबत गुपीत बाहेर येऊ शकते. एमपीटी चेअरमननी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, मंत्री मिलींद नाईक यांच्या दबावामुळेच जहाज एमपीटीमध्ये राहिले. या प्रकरणाशी काँग्रेसचा संबंध असता तर त्यांना भाजपने देशद्रोही संबोधले असते, असेही ते म्हणाले. 15 जुलै रोजी जहाज आले त्या दिवसापासून या जहाजाची माहिती द्यायला हवी होती. दुरुस्तीची सुविधा एमपीटीमध्ये नसताना हे जहाज एमपीटीमध्ये का आणले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एका मंत्र्याला पैसे करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून सरकार लोकांना धोक्यात घालत आहे.

या जहाजाचा मोठा परिणाम पर्यटनावर होणार आहे. या जहाजाचा स्फोट झाल्यास प्रचंड मोठी हानी होणार आहे. किनारी भागात भाजपचे मंत्री, आमदार आहेत. मात्र ते काहीही बोलायला तयार नाहीत. जहाज प्रकरणात जे सहभागी आहेत त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याची मागणीही चोडणकर यांनी केली.

म्हादईबाबत मुख्यमंत्र्यांनी काय केले ?

म्हादईच्या विषयावरून गोवा फॉरवर्ड व त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करणाऱया मुख्यमंत्र्यांनी म्हादईबाबत काय केले ते सांगावे. मागील 15 दिवसात मुख्यमंत्र्यांनी काय केले ते सांगावे, असेही चोडणकर म्हणाले.

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही

राज्यपाल मलिक यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास नसल्याने सहा महिन्यांसाठी लोकांना राजभवनवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था एवढी असताना लोकांना राजभवनवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. कारण राज्यपालांना गृहमंत्रालयावर विश्वास राहिलेला नाही, असेही ते म्हणाले.

Related posts: