|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘लसीकरण मोहीम’: एक पाऊल प्रगतीचे

‘लसीकरण मोहीम’: एक पाऊल प्रगतीचे 

‘उपचारांपेक्षा प्रतिबंध उत्तम’ या उक्तीनुसार आरोग्यक्षेत्रात अनेक चांगल्या पायंडय़ांवर भर दिला गेलेला दिसून येतो. ‘लसीकरण’ हा असाच एक चांगला पायंडा. ज्याचे पुढे मोहिमेत रुपांतरण झाले. संभाव्य आजारांचा धोका लक्षात घेऊन, आजारांच्या रोगजंतूंपासून शरीराचे संरक्षण करण्याकरिता प्रतिकारशक्ती वाढवणे हा लसीकरणाचा मूळ उद्देश. लसीकरणाचा मोठा फायदा हा बालमृत्युंना आळा घालण्यास होत असला तरी विनामूल्य आणि सहज उपलब्ध असणाऱया रोगप्रतिकारक लसींची टोचणी न झाल्याने प्रत्येक वषी भारतात 1.7 दशलक्ष मुले विविध आजारांना बळी पडतात. भारतात 1978 मध्ये ‘विस्तारित लस टोचणी कार्यक्रम’ सुरू करण्यात आला. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ आणि क्षयरोग या पाच रोगांविरोधात लढण्याकरिता हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1985 मध्ये ‘गोवर’ च्या लसीचा समावेश करून हाच कार्यक्रम पुढे ‘सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम’ म्हणून सुरू राहिला. मोठय़ा प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवणारा भारत एक प्रमुख देश आहे. लसींची उपलब्धता, लाभार्थ्यांची संख्या, विस्तारित भूप्रदेश आणि मानवी संसाधनांची गुंतवणूक हे सर्व घटक या यंत्रणेची परिणामकारकता वाढवतात. गेली 33 वर्षे ही यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत असूनही एक वर्षाच्या आतील ‘संपूर्ण लसीकरण’ होणाऱया बालकांचे प्रमाण केवळ 65% च आहे. भारतात दरवषी सव्वीस दशलक्षपेक्षा अधिक बालके जन्माला येतात. त्यातील 7.4 दशलक्ष बालके ‘संपूर्ण लसीकरणा’पासून दूर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

‘संपूर्ण लसीकरण’ हे शरीरास त्या त्या रोगांविरोधात लढण्याची पूर्ण ताकद देत असते. अर्धवट लसीकरण हे चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूप्रमाणे ठरते. सुरक्षित बालकत्वाची सुरुवात ही गर्भावस्थेपासूनच होत असते. गर्भवती महिलांना किमान दोन धनुर्वात विरोधी लस टोचून, बाळ-मातेला या गंभीर आजाराच्या संसर्गापासून सुरक्षितता दिली जाते. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये पोषक आहाराची कमतरता, स्वच्छ सूर्यप्रकाश, उजेड, हवा असणाऱया निवाऱयाची असुविधा, परिसरातील अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, पिण्यायोग्य पाण्याचा अभाव या सर्व गोष्टी अनारोग्यास आमंत्रण देत असतात. संसर्गजन्य आजारास अशी परिस्थिती पोषक असते. या परिस्थितीत संपूर्ण लसीकरण हे बालकास जीवन संजीवनी ठरू शकते. खरेतर जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाला दिले गेलेले स्तनपान ही बाळासाठीची पहिली लस आहे. आपल्याकडील अनेक गैरसमजांमुळे आजही कित्येक नवजात शिशुंना या नैसर्गिक लसीपासून वंचित ठेवले जाते. लसीकरणाची परिणामकारकता वाढवण्याकरिता त्याचे वेळापत्रक पाळणेही महत्त्वाचे असते. शारीरिक व्यंग असणारी बालके, कुपोषित बालके अथवा किरकोळ ताप असणारी बालके यांना ठरलेल्या वेळी लसीकरण करणे सुरक्षित असते.

‘दो बूँद जिंदगी के’ ही अमिताभ बच्चन यांनी केलेली पोलिओ लसीकरणाची परिणामकारक जाहिरात आपल्या सर्वांच्या स्मरणात असेलच. भारताने पोलिओ लसीकरणाची व्यापक आणि सार्वत्रिक मोहिम राबवली आणि 27 मार्च 2014 रोजी भारत पोलिओ मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनने दिले. त्यानंतर भारतापुढील आव्हान होते ते संपूर्ण लसीकरणाचे. लसीकरणापासून पूर्णत: अथवा अंशत: वंचित असलेली शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे 2020 पर्यंत संपूर्ण लसीकरण करण्यासाठी पल्स पोलिओच्या धर्तीवर भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 25 डिंसेबर 2014 पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’ नावाने विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थेमार्फत लसीकरणाअंतर्गत पूर्वी बी.सी.जी, घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात (त्रिगुणी लस), गोवर, कावीळ-ब आणि तोंडावाटे देण्यात येणारे पोलिओचे डोस हे लसीकरण मोफत होत होते. मिशन इंद्रधनुष्यअंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्हय़ातील बालकांच्या लसीकरणात पेंटाव्हॅलंट, रोटाव्हॅक्सीन आणि इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिनचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पूर्वी दिल्या जात असणाऱया त्रिगुणी लसीच्या डोसामध्ये कावीळ आणि हय़ुमन इन्फ्ल्यूएन्झा-बी प्रतिबंधक घटकांचाही समावेश करण्यात आला. पूर्वी देण्यात येणाऱया सात लसींऐवजी आता बारा लसींचा समावेश करण्यात आला आहे.

ही मोहीम एकूण पाच टप्प्यात राबविण्यात येत आहे. त्यात एकूण 528 जिल्हय़ांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरणाचे किमान काम झालेल्या, देशातील 28 राज्यांमधून 201 जिल्हय़ांची निवड करण्यात आली. अंशत: लसीकरण झालेली अथवा लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे प्रमाण अधिक असलेली ही राज्ये आहेत. या 201 जिल्हय़ांपैंकी 82 जिल्हे हे केवळ उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत. या 82 जिल्हय़ातील पंचवीस टक्के मुलांचे लसीकरण झालेले नाही. महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि बारा महानगरपालिकांची या मोहिमेअंतर्गंत निवड करण्यात आली आहे. बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे यांचा त्यात समावेश आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातच लसीकरण व्याप्ती ही एक टक्क्मयांहून 6.7 टक्क्मयांपर्यंत पोहचली. या मोहिमेचे एकूण चार टप्पे पार पडले आहेत. चौथा टप्पा हा ‘इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य’ होता. त्या अंतर्गंत नव्वद टक्के बालकांचे संपूर्ण लसीकरण हे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या टप्प्यात पूर्वोत्तरेकडील 68 जिल्हय़ांचा समावेश करण्यात आला होता. आजमितीला 3.39 कोटी बालके आणि 87.2 लाख गर्भवती महिलांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यश मिळाले आहे. शेवटचा अर्थात पाचवा टप्पा हा ‘इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य (आय एम आय) 2.0’ हा डिंसेबर 2019 पासून सुरू करण्यात येत असल्याचे नुकतेच आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.‘मिशन इंद्रधनुष्य’ अंतर्गंत स्थलांतरित कुटुंबातील बालके आणि गर्भवती महिलांना लसीकरणाच्या टापूत आणण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. सध्या तरी हा प्रकल्प काही राज्यांमधील लसीकरणाबाबत मागासलेल्या जिल्हय़ांपुरता आहे. लोकांमध्ये लसीकरणाबाबतची जागरुकता वाढवणे हे मोठे आव्हान आहे. त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. तशी कृती-योजना महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्षात अमलातही आणली आहे. ‘पोषण अभियान कार्यक्रमा’अंतर्गंत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करून, त्यावर लाभार्थ्यांच्या सर्व नोंदी रोजच्या-रोज ठेवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. माध्यमांचा उपयोग करायचा की दुरुपयोग हे आपल्या हातात आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराने लसीकरणासारख्या आरोग्यदायी मोहिमेला खीळ बसते, हे आपल्याला गोवर-रुबेला लसीकरणाच्यावेळी पहावयास मिळाले होते. व्हॉट्स-अपवर फिरलेल्या एका व्हीडिओमुळे पुरोगामी म्हणवणाऱया महाराष्ट्रातही बुलढाणा, मलकापूर आणि सोलापूर येथे या लसीकरणास विरोध झाला होता. त्यासाठी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे।  परंतु, तिथे अधि÷ान पाहिजे, भगवंताचे’। लसीकरणाच्या चळवळीतही अनारोग्य दूर करण्याचे सामर्थ्य आहे, त्याला लोकसहभागाचे आणि अचूक अंमलबजावणीचे अधि÷ान असायला हवे. येत्या दहा नोव्हेंबरला ‘जागतिक लसीकरण दिवस’ साजरा होईल. त्यानिमित्ताने लसीकरणाची मोहिम अधिक बळकट होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची अपेक्षा आहे.

Related posts: