|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » ऑनलाईन गेमिंग : चीन कठोर

ऑनलाईन गेमिंग : चीन कठोर 

बीजिंग :

चीनने मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याची वाढती प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. चीनने याकरता नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना एका दिवसात 90 मिनिटांपेक्षा अधिक वेळ ऑनलाईन गेम खेळता येणार नाही. याचबरोबर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत गेम खेळण्यास बंदी असणार आहे.

नव्या दिशानिर्देशात ऑनलाईन गेमसाठी खर्च होणाऱया रकमेवरही कात्री चालविण्यात आली आहे. आता मुलांना गेमवर दर महिन्याला 200 युआनहून (सुमारे 2 हजार रुपये) अधिक रक्कम खर्च करता येणार नाही. 16 ते 18 वयोगटातील मुलांसाठी याची मर्यादा 400 युआन (सुमारे 4 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे.

नव्या नियमांतर्गत गेम खेळणाऱया मुलांना स्वतःच्या खऱया नावाने नोंदणी करावी लागेल. चिनी मेसेजिंग सोशल मीडिया व्हीचॅटवर स्वतःचे खाते, संपर्क क्रमांक यासारखा तपशील मांडावा लागणार आहे. चीनच्या प्रशासनाने या दिशानिर्देशात गेम निर्मार्त्यांना स्वतःच्या गेम कंटेंट आणि नियमांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.

चीन हा जगातील सर्वात मोठा व्हिडिओ गेम बाजार आहे. पण मुलांची जवळची दृष्टीक्षमता कमी होणे आणि ऑनलाईन गेमच्या सवयीबद्दल वाढत्या चिंता पाहता चीनच्या प्रशासनाने व्हिडिओ गेम क्षेत्रावर अंकुश आणण्याची भूमिका घेतली आहे.

 

Related posts: