|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलीस लाईनमध्ये चोरीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पोलीस लाईनमध्ये चोरीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी / सांगली :

विश्रामबाग येथील पोलीस लाईनमधील पोलिसाचे घर फोडून चोरटय़ाने अकरा तोळे सोने, रोख रक्कम असा तीन लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही चोरी उघडीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अंजना भालचंद्र चंदनशिवे (रा. वारणाली) यांनी फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, की फिर्यादी चंदनशिवे यांचे बंधू हिरालाल शंकर कांबळे हे पोलीस लाईनमध्ये खोली क्रमांक 200 मध्ये राहतात. कांबळे हे सांगली पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते दिवाळी सुट्टीनिमित्त कुटुंबासह मंगळवारी सकाळी 11 वाजता बालाजीला देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तिजोरीतील साडेपाच तोळ्याचे एक लाख 14 हजाराचे गंठण, साडेतीन तोळय़ाची सत्तर हजार रूपयांची मोहन माळ, कानातले, अंगठी, सोन्याची चेन, ब्रेसलेट, नथ आणि रोख वीस हजार असा तीन लाख 32 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

दरम्यान, काल सकाळी साडेआठच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर शेजारील लोकांनी कांबळे यांना कळविले. कांबळे यांनी त्यांची बहीण चंदनशिवे यांना चोरीचा प्रकार सांगितला. चंदनशिवे यांनी तातडीने संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी श्वान पथकास घटनास्थळी प्राचारण केले होते. ठसे तज्ञांच्या सहायाने ठसेही घेतले. सराईत चोरटय़ांनी ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यानुसार आता तपास सुरू आहे.

 

Related posts: