|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटणमध्ये ट्रक पूलावरुन कोसळून दोन ठार

फलटणमध्ये ट्रक पूलावरुन कोसळून दोन ठार 

प्रतिनिधी /फलटण :

सततच्या अपघाताचे केंद्र ठरलेल्या आणि सावर्जनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केलेल्या फलटण ते पंढरपुर रस्त्यावरील रावरामोशी पुलाच्या वळणावर कठडा तोडून कॅनॉलमध्ये पाण्यात ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, दि. 6 रोजी रात्री सुमारे 10.30 च्या सुमारास फलटण ते पंढरपुर रस्त्यावर फलटण शहरानजीक असलेल्या नीरा उजवा कालव्याच्या रावरामोशी पुलाच्या धोकादायक वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने ए पी 02 टी बी 9945 हा ट्रक पुलाच्या संरक्षक कठडय़ाला लावलेला पत्रा तोडून कॅनॉलमध्ये पलटी झाला. सध्या कॅनॉलला पाणी आवर्तन सुरू असल्याने गाडीतील चालक व किन्नर अपघातात अडकल्याची शक्यता होती. फलटण शहर पोलीस कर्मचाऱयांनी एका क्रेनच्या सहाय्याने ट्रक काढण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रकमध्ये अवजड माल असल्याने ट्रक काढण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. यावेळी पाण्यात शोध घेतला असता पाण्यात उतरून ट्रकच्या केबिनमध्ये दोन इसम मयत असल्याचे दिसून आले. दि 7 रोजी सकाळी पोलीस कर्मचाऱयांनी तीन क्रेन मागवून ट्रक काढण्याचा प्रयत्न केला असता ट्रकच्या केबिनमध्ये मुल्ला मुस्तहान वली (वय 52) रा.अल्लाबक्ष गल्ली ताडपत्री अनाथपुरम आंध्रप्रदेश व  लक्ष्मीनारायण रेड्डी ( वय 49) रा. पुतलुर मांडलम मद्दीपल्ली अनाथपुरम आंध्रप्रदेश यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची फिर्याद पो. हा अंकुश गार्डी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

Related posts: