|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » एकतर्फी विजयासह बांगलादेशला लोळवले

एकतर्फी विजयासह बांगलादेशला लोळवले 

रोहितसेनेचा 8 गडी राखून सहज विजय, टी-20 मालिकेत तूर्तास 1-1 ने बरोबरी, आता लक्ष निर्णायक लढतीकडे

@ राजकोट / वृत्तसंस्था

कर्णधार रोहित शर्मा व सहकारी सलामीवीर शिखर धवन यांनी झंझावाती फलंदाजी साकारल्यानंतर भारताने येथील दुसऱया टी-20 सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून फडशा पाडला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी प्राप्त केली. विजयासाठी 154 धावांचा पाठलाग करताना रोहितने 43 चेंडूत 6 चौकार, 6 षटकारांसह 85 धावांची तुफानी खेळी साकारली तर धवनने त्याला समयोचित साथ देताना 27 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावांचे योगदान दिले.

बांगलादेशने येथे निर्धारित 20 षटकात 6 बाद 153 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात भारताने 15.4 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.

यापूर्वी, दिल्लीतील पहिल्या लढतीत बांगलादेशने जिगरबाज विजय संपादन करत भारताला जोरदार धक्का तर दिलाच होता. शिवाय, येथे मालिकाविजयाच्या दिशेनेचे त्यांची मोर्चेबांधणी सुरु होती. पण, येथे भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बांगलादेशी फलंदाजांना जखडून ठेवल्यानंतर त्यांच्यावर रोहित-धवनचे वादळ घोंघावले आणि त्यांच्या मनसुब्यांचाही चक्काचूर झाला. या लढतीत माहा वादळाचा व्यत्यय येणार, अशी अटकळ यापूर्वी होती. पण, प्रत्यक्षात ते वादळ येथे सरकलेच नाही. उलटपक्षी, रोहितच्या झंझावातात बांगलादेशी संघ पूर्णपणे नेस्तनाबूत झाला.

भारताचा भेदक मारा

यजुवेंद्र चहलच्या आघाडीखालील भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 6 बाद 153 धावांवर रोखले. या लढतीत बांगलादेशला उत्तम प्रारंभानंतरही त्यावर कळस चढवता आला नाही. भारताने येथे नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. प्रारंभी, बांगलादेशच्या आघाडीवीरांनी उत्तम सुरुवात केली आणि यामुळे भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवण्यासाठीही 13 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सलामीवीर लिटॉन दास (21 चेंडूत 4 चौकारांसह 29) व मोहम्मद नईम (31 चेंडूत 5 चौकारांसह 36) यांनी येथे 60 धावांची सलामी दिली होती.

नईमने दडपणाखालील युवा मध्यमगती डावखुरा गोलंदाज खलील अहमदवर (4 षटकात 0-44) पुन्हा एकदा जोरदार आक्रमण चढवत सलग तीन चौकार फटकावले आणि येथेच त्याचे सारे पृथक्करण बदलून गेले. मध्यमगती गोलंदाज दीपक चहर (1-25) व ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर (1-25) यांनी धावा रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, खलीलचा खराब फॉर्म त्यानंतरही कायमच राहिला.

यष्टीरक्षक ऋषभ पंतने लिटॉन दासला चुकीच्या पद्धतीने यष्टीचीत केल्यानंतर दास यातून बचावला. नंतर त्याने लागोपाठ दोन चौकार फटकावत भारताच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. लिटॉनला 26 धावांवर कर्णधार रोहित शर्मानेही आणखी एक जीवदान दिले. अर्थात, पुढे आठव्या षटकात पंतने थेट थ्रोवर दासला धावचीत करत आपल्या चुकीची दुरुस्ती केली.

लिटॉन दास बाद झाल्यानंतर बांगलादेशच्या धावगतीवर चांगलाच परिणाम झाला आणि यामुळे नईमवर अधिक दडपण आले. नईमने दडपण झुगारुन टाकण्याच्या प्रयत्नात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवरील श्रेयस अय्यरकडे सोपा झेल दिला. बांगलादेशची यावेळी 11 षटकात 2 बाद 83 अशी स्थिती होती.

यजुवेंद्रने डावातील 13 व्या षटकात मुश्फिकूर रहीम (6 चेंडूत 4) व सौम्या सरकार (20 चेंडूत 30) यांना बाद करत भारतासाठी दिलासा दिला. रहीमने कृणाल पंडय़ाकडे झेल दिला तर सरकारला पंतने यष्टीचीत केले. महमुदुल्लाह व अफिफ होसेन यांनी 25 धावांची भागीदारी साकारली खरी. पण, खलीलने ही जोडी फोडल्यानंतर बांगलादेशची 5 बाद 128 अशी पडझड झाली. निर्णायक टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित मारा केल्यानंतर बांगलादेशला कसाबसा 150 धावांचा टप्पा गाठता आला.

धावफलक

बांगलादेश ः लिटॉन दास धावचीत (पंत) 29 (21 चेंडूत 4 चौकार), मोहम्मद नईम झे. अय्यर, गो. वॉशिंग्टन सुंदर 36 (31 चेंडूत 5 चौकार), सौम्या सरकार यष्टीचीत पंत, गो. चहल 30 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मुश्फिकूर रहीम झे. पंडय़ा, गो. चहल 4 (6 चेंडू), महमुदुल्लाह झे. दुबे, गो. चहर 30 (21 चेंडूत 4 चौकार), अफिफ होसेन झे. शर्मा, गो. अहमद 6 (8 चेंडू), मोसद्देक होसेन नाबाद 7 (9 चेंडू), अमिनूल इस्लाम नाबाद 5 (5 चेंडूत 1 चौकार). अवांतर 6. एकूण 20 षटकात 6 बाद 153.

गडी बाद होण्याचा क्रम ः 1-60 (लिटॉन दास, 7.2), 2-83 (नईम, 10.3), 3-97 (रहीम, 12.1), 4-103 (सौम्या सरकार, 12.6), 5-128 (होसेन, 16.3), 6-142 (महमुदुल्लाह, 18.3).

गोलंदाजी ः दीपक चहर 4-0-25-1, खलील अहमद 4-0-44-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-25-1, यजुवेंद्र चहल 4-0-28-2, शिवम दुबे 2-0-12-0, कृणाल पंडय़ा 2-0-17-0.

भारत ः रोहित शर्मा झे. बदली खेळाडू (मिथुन), गो. अमिनूल इस्लाम 85 (43 चेंडूत 6 चौकार, 6 षटकार), शिखर धवन त्रि. गो. अमिनूल 31 (27 चेंडूत 4 चौकार), केएल राहुल नाबाद 8 (11 चेंडू), श्रेयस अय्यर नाबाद 24 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 6. एकूण 15.4 षटकात 2 बाद 154.

गडी बाद होण्याचा क्रम ः 1-118 (धवन, 10.5), 2-125 (रोहित, 12.2).

गोलंदाजी ः मुस्तफिजूर 3.4-0-35-0, शफिउल 2-0-23-0, अमिन होसेन 4-0-32-0, अमिनूल इस्लाम 4-0-29-2.

उभय संघातील तिसरी व शेवटची लढत रविवारी नागपूरमध्ये होईल.

…अन् भारताला ऋषभ पंतची घाई नडली!

चहलने आपल्या स्पेलमधील पहिल्याच टप्प्यात जम बसलेल्या लिटॉन दासचा बळी घेत उत्तम सुरुवात केलीच होती. पण, ऋषभ पंतची घाई संघासाठी नडली. पंतने यावेळी यष्टीच्या पुढे हात करत चेंडू कलेक्ट करून फलंदाजाला यष्टीचीत केल्याचे निदर्शनास आले व यामुळे नियमानुसार तो नोबॉल जाहीर केला गेला. क्रिकेटमधील नियम पुस्तिकेनुसार, यष्टीरक्षकाचे ग्लोव्ह्ज नेहमी यष्टीच्या मागेच असायला हवेत, तो नियम पंतने येथे मोडला असल्याने पंचांनी नोबॉल जाहीर केला.

Related posts: