|Saturday, February 22, 2020
You are here: Home » विविधा » लडाखमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे केंद्र

लडाखमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे केंद्र 

पुणे  / प्रतिनिधी : 

नव्याने अस्तित्वात आलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून,  यासंदर्भात विद्यापीठाच्या समितीने लडाखला भेट द्यावी, असे निमंत्रण विद्यापीठाला  प्राप्त झाले आहे.

लडाखचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना नुकतेच याबाबत पत्र पाठविले असून, येत्या 15 नोव्हेंबरपूर्वी लडाख येथे भेट द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत विद्यापीठाची अभ्यास समिती लडाख येथे भेट देईल. त्यानंतर लडाख येथे हे केंद्र नेमके कुठे सुरू करावे, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी स्पष्ट केले.

 जम्मू-काश्मीरसाठी लागू असलेले 370 कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक संस्था व उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पुण्यातील शैक्षणिक संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही याबाबत ठराव करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी लडाख येथील काही शैक्षणिक संस्थांना भेट दिली होती. भौगोलिक मर्यादांमुळे विद्यापीठाला लडाखमध्ये शैक्षणिक केंद्र स्थापन करणे शक्मय नसल्याचेही त्या वेळी स्पष्ट झाले. मात्र, विद्यापीठाने तेथे संशोधन केंद्र स्थापन करावे, असा प्रस्ताव पुढे आला होता.

संशोधन केंद्राला गती

यासंदर्भात लडाख येथील हिमनदी, भू शास्त्र, नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी व जैविक शेती आणि औषधी वनस्पती यांसह इतर क्षेत्रांत संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाचारण करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाला आवश्यक असणारी जमीन, सोयीसुविधा, आवश्यक मनुष्यबळ याबाबतची माहिती विद्यापीठाकडून मागविण्यात आली आहे. त्यावर स्थानिक स्टेकहोल्डर्स (भागधारक) आणि आर्थिक गुंतवणूकदारांची पहिली बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे लडाख येथे विद्यापीठाचे संशोधन केंद्र सुरू होण्यास आता गती मिळली आहे.

Related posts: