|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संवाद » युग हे विज्ञानाचे…!

युग हे विज्ञानाचे…! 

युनेस्कोने 2002 पासून 10 नोव्हेंबर हा जागतिक विज्ञान दिन म्हणून आचरण्यास प्रारंभ केला. यंदाचे घोषवाक्य आहे, ‘विज्ञान लोकांसाठी व लोक विज्ञानासाठी’… पाहूया विज्ञान दिनाविषयी…

आपल्या सर्व गरजा पुरवणारी, विविध रहस्ये उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. हे विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक परीस आहे. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडीप्रमाणे दूर केला. या विज्ञानाने मानवी जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. चाकाच्या शोधानंतर मानवी जीवनाला गती मिळाली. मानवाच्या प्रत्येक गरजा पुरवणारी यंत्रे विज्ञानाने दिली. मानवाच्या जीवनाला स्थैर्य लाभले. अनेक कठीण कामे सुलभ झाली. वेळ लांबवणारी कामे क्षणार्धात होऊन वेळेची बचत होऊ लागली.

अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने ज्ञानाच्या शाखा रूंदावल्या. संगणकीकरणाच्या या एकविसाव्या शतकात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान अफाट विस्तारले आहे. एका क्लिकवर आपल्याला जगभराची माहिती मिळते. सातासमुद्रापलीकडे असणारे जग जवळ आले आहे. मोबाइल तर संदेशवहनाची खाणच आहे. मोठय़ा प्रमाणावर संदेशवहनामुळे कल्पनांची देवाणघेवाण होऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण अशा विविध क्षेत्रात विलक्षण क्रांती घडून आली आहे. अंधश्रद्धेपासून अलिप्त असा नवा समाज निर्माण झाला. मानवाने भूमीप्रमाणे सागरावर आणि अंतरिक्षावरही स्वामित्त्व मिळवले आहे.

निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती  म्हणजे विज्ञान. वेगळय़ा शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुसंगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही, हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. ’पुरावा तेवढा विश्वास’ या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते, हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती. म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!

विज्ञानाची सुरुवात झाली आग पेटवून, ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकांवर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडय़ा कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळय़ा परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन.

जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱया चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.

कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे, हे तर विज्ञानाचं आधारतत्त्व. ’ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते’ असं म्हटलं तर ते सिद्ध करता आलं पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उपडय़ा हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. ’पदार्थाचं आकारमान वाढलं किंवा वाढवलं तर त्याची घनता कमी होते’ असं म्हटलं तर आपल्याला हे करून बघता येतं की लोखंडाचा पातळ पत्रादेखील पाण्यात बुडतो; पण तो वाकवून त्याला होडीचा आकार दिला की तो पाण्यावर तरंगतो. बर्फ हे पाण्याचं घनरूप; पण ते तयार होताना त्याचं अनियमित प्रसरण होत असल्यामुळे त्याची तुलनात्मक घनता कमी होते आणि तेही पाण्यावर तरंगतं.

मात्र, विज्ञान फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकते, हाव नाही. विज्ञानाने शोधलेल्या यंत्रांनी कष्टाचे महत्त्व नाहीसे झाले व माणूस आळशी बनला. स्वयंपाकापासून खेळापर्यंत… उद्योगापासून प्रगतीपर्यंत… सर्व गोष्टी जलद व सुलभ रीतीने करण्याचे तंत्र विज्ञानाने दिले. पण आपण मात्र शरीरासाठी आवश्यक व्यायाम, अन्नाचा ताळमेळ निसर्गाचे सान्निध्य सर्व काही हरवून बसलो. जलद जीवनशैलीत आपण आपली माणुसकीच विसरलो, ही चूक आपण वेळीच सुधारूया…!

Related posts: