|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोघांवर गुन्हा दाखल करणार

दोघांवर गुन्हा दाखल करणार 

पोलिसांच्या ग्वाहीनंतर दर्शनाचा मृतदेह ताब्यात : दर्शना गवस मृत्यू प्रकरण

प्रतिनिधी / सावंतवाडी:

झोळंबे येथील दर्शना गवस हिच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ग्वाही सावंतवाडी पोलिसांनी दिली. त्यामुळे गवस कुटुंबियांनी दर्शनाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याप्रकरणी सध्या दोघांवर गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणी दर्शनाचा भाऊ महेश याची फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. दर्शनावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

आत्महत्येप्रकरणी कारवाई केल्यानंतरच नातेवाईक मृतदेह ताब्यात घेतील, असे जि. प. माजी सदस्य एकनाथ नाडकर्णी आणि भाजपचे संजू परब यांनी निरीक्षक सुनील धनावडे यांची भेट घेऊन स्पष्ट केले. नाडकर्णी, परब यांनी कारवाईची मागणी नातेवाईकांच्यावतीने लावू धरल्याने अखेर धनावडे यांनी कारवाई करण्याची ग्वाही दिली. पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे.

झोळंबे (दोडामार्ग) येथील दर्शना गवस हिचा मृतदेह कोलगाव-कासारवाडा येथील  विहिरीत गुरुवारी आढळला. दर्शना ही कोलगाव-चाफेआळी येथील मैत्रिण स्नेहा राऊळ हिच्याकडे गेल्या दहा महिन्यापासून राहत होती. तत्पूर्वी ती गोव्यात नोकरीस होती. नोकरी सोडून ती कोलगावला राहत होती. ती तेथे छोटी-मोठी कामे करत होती. बुधवारी ती घरी झोपली होती. मात्र, गुरुवारी तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत तरंगतांना आढळला. याबाबत गोविंद माईणकर यांनी पोलिसांत खबर दिली होती. त्यानंतर दर्शना हिच्या झोळंबे येथील कुटुंबियांना कळविण्यात आले. त्यानंतर तिचे कुटुंबीय सावंतवाडीत दाखल झाले. तसेच एकनाथ नाडकर्णी यांना कुटुंबियांनी बोलावून घेतले. दर्शनाच्या
मृत्यूप्रकरणाबाबत चौकशी करून संबधितांवर कारवाईची मागणी करत जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले.

तो नव्हे ती!

दरम्यान, दर्शनाच्या गळय़ात गंठण होते. तसेच पप्पू नामक व्यक्तीने दर्शनाच्या कुटुंबाला दर्शनाबरोबर विवाह केल्याचे सांगितले होते. तसेच दर्शनाच्या चुलत बहिणीच्या व्हॉट्सऍपवर फोटो पाठवला होता. ही व्यक्ती नातेवाईकांसमोर आल्यानंतर ती स्त्राr असल्याचे स्पष्ट झाल्याने नातेवाईक चक्रावून गेले. त्यामुळे दर्शना हिच्याबाबत नेमके काय घडले, त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नाडकर्णी यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणात रॅकेट असल्याचा संशय नाडकर्णी यांनी व्यक्त करून जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन जबाबदार असणाऱयांना अटक होत नाही तोपर्यंत दर्शनाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, दर्शनाचा मृत्यू बुडून झाल्याचा अहवाल डॉक्टरनी दिला होता. त्यामुळे संशयास्पद काहीच नाही. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घ्यावा, अशी भूमिका पोलिसांनी मांडली. परंतु दर्शनाच्या गळय़ात असलेले मणी मंगळसूत्र, तिच्यासोबत लग्न केल्याचा पप्पू नामक व्यक्तीने केलेला दावा यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. गुरुवारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला नाही.

आंदोलनाच्या इशाऱयानंतर ग्वाही

शुक्रवारी कुटुंबियांनी नाडकर्णी व परब यांची भेट घेतली. त्यानंतर नाडकर्णी, परब यांनी पोलीस निरीक्षक धनावडे यांची भेट घेऊन दर्शनाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर दर्शनाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ग्वाही पोलिसांनी दिली. त्यानंतर दर्शनाचा मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय भाऊ महेश गवस आणि कुटुंबियांनी घेतला.

दरम्यान, दर्शना हिने लग्न केले नव्हते. पप्पूने दर्शना हिच्या सांगण्यावरून  बनाव केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. दर्शना हिने लग्न केल्याचे पप्पूने सांगितले होते, लग्न केल्यानंतर मुलीचे निधन झाल्यास अंत्यविधी सासरीच केला जातो. त्यामुळे अंत्यविधी करण्यास दर्शनाच्या भावाने नकार दिला. परंतु आता यावर मार्ग निघाला आहे. दर्शनाचा मृत्यू बुडून झाल्याचा अहवाल आला आहे.

Related posts: