|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पहिला अंक संपला

पहिला अंक संपला 

प्रदीर्घ वेगवान राजकीय घडामोडीनंतरही मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेली राज्यातील सत्तासंघर्षाची कोंडी फुटलीच नाही. शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यामुळे राज्यातील राजकीय नाटय़ाचा पहिला अंक संपला असून उर्वरित अंकातील राजकीय घडामोडींची उत्कंठा लागली आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय पावले उचलतात, याकडे लक्ष लागून आहे. जर शिवसेनेने सत्तेसाठी दावा केला तर त्यांना काँग्रेस आघाडीची मदत घ्यावी लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा इतिहास तपासून पाहिला आणि त्यांच्यातील मूलभूत विचारधारेतील मतभेदाचा विचार केला तर आघाडीच्या पाठिंब्यावरील शिवसेनेचे सरकार  हे अस्थिर राहणार आहेत. कारण सरकार जरी शिवसेनेचे असले तरी कासरा मात्र शरद पवारांच्या हाती असणार आहे. शिवसेनेला  हे कितपत रूचेल हा देखील प्रश्न आहे. याउलट युती तुटली असे भाजप आणि शिवसेना हे अद्यापही मान्य करायला तयार नाहीत. सत्तास्थापन कसे करणार, याचे गुपित उद्धव ठाकरेंनीही फोडलेले नाही. दुसऱया बाजूला भविष्यात भाजपच सरकार स्थापन करेल, अशी गुगली मुख्यमंत्र्यांनी जाताजाता टाकली आहे. भाजप आणि सेना या दोघांच्याही निवेदनामध्ये स्पष्टता आढळत नाही. त्यामुळेच महायुतीच्या सरकारबाबत अजूनही संदिग्धता जाणवते.  गेले 15 दिवस मातोश्री, वर्षा आणि सिल्वर ओक हे बैठका, चर्चा, गोपनीय खलबते आणि राजकीय चाली-हालचालींचे केंद्र बनले होते. विधानसभेचा कार्यकाल आज संपत असल्यामुळे यापुढील घटनात्मक जबाबदारी आता राज्यपालांवर येऊन पडली आहे. ते यापुढे कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तास्थापनेचा दावा करेल, कार्यकाल संपला म्हणून मुख्यमंत्री राजीनामा देतील, दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सत्तेचा दावा करेल, काळजीवाहू सरकार म्हणून काही काळासाठी  पुन्हा  मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी येईल, सर्व पर्यायांच्या चाचणीनंतर राज्यपाल अखेर राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अखेर राज्यपालांनीच यापुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. जनादेश देऊनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये सत्तेचा  पोरखेळ सुरू होता, त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळाली हे मात्र खरे. प्रगत, सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ख्याती. पण सत्तालोलुपतेच्या खेळामुळे देशभर नाचक्की झाली. सत्तासंपादनाच्या क्लेशकारक वादामुळे राजकीय नेत्यांनी जनतेचाही अनादर केला. भाजपचा मुर्दाडपणा, शिवसेनेचा आक्रस्ताळेपणा यामुळे ’भाजपनं घेतला पंगा, सेनेनं दावला इंगा’ आणि ’ठरलं तेच घेणार’ या राजकीय वगनाटय़ाचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. यातून जनतेची करमणूक झाली. राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा इतक्या रसातळाला नेऊन पोहोचवली की सोशल मीडियातून यावर पांचट विनोद होऊ लागले की, ’लहान मुलांच्या हगीज सारखं यांचं झालंय, थोडय़ा थोडय़ा वेळानं बघायला लागतं, झाला का मुख्यमंत्री-झाला का मुख्यमंत्री..!’ दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. याचठिकाणी वादाची ठिणगी पडली. त्याचे पुढे राजकीय वणव्यात रूपांतर झाले. मुख्यमंत्रिपदाचा फिफ्टी-फिफ्टी असा काही फॉर्म्युला ठरला नव्हता. सत्तेच्या वाटणीत मुख्यमंत्रिपद येत नाही. पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल असे वाटत असेल, पण वाटणे वेगळे आणि घडणे वेगळे. वगैरे वगैरे. वास्तविक एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखा चार भिंतीतील हा वाद चर्चेने सोडवता आला असता. पण सेनेला डिवचण्याच्या नादात भाजपने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. समान सत्तावाटपाच्या मुद्यावरुन आपल्याला खोटे ठरवले जाते आहे हाच राग उद्धव ठाकरेंच्या मनात होता. पत्रकार परिषदेतही तो त्यांच्या वाक्यावाक्यातून व्यक्त होत होता.   मागील पाच वर्षात भाजपने शिवसेनेला  दुय्यम दर्जाची वागणूक  दिली. (केंद्रात व राज्यात त्यांच्या वाटय़ाला आलेली कमी दर्जाची खाती), दबाव आणि दादागिरीने जागावाटपात  मोठा वाटा पदरात पाडून घेतला. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून सेनेला डिवचले. वास्तविक भाजपनेच ही सर्व राजकीय परिस्थिती स्वतःभोवती निर्माण केली आणि आता कुरकुर न करता ती स्वीकारण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही. गोड बोलून  शिवसेना संपवण्याचा भाजपचा हेतू होता, अशी सल उद्धव ठाकरे यांनी बोलूनही दाखवली. यानिमित्ताने शिवसेनेने भाजपवर एक प्रकारे राजकीय सूड उगवला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मदतीला धावून आली होती. शिवसेनेला झिडकारून भाजपने त्यावेळी बहुमत नसताना सत्ता स्थापन करण्याचे धाडस केले. अखेर झक मारत शिवसेनेला भाजपच्या मागून फरपटत यावे लागले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप त्याच पवारांना राजकीयदृष्टय़ा संपवायला निघाली होती. राष्ट्रवादीत फोडाफोडी करून पक्ष अक्षरशः खिळखिळा केला. पवारांच्या मागे ईडी लावली. आता तेच पवार किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. भाजपला रोखण्यासाठी आवश्यक तो व्हिटॅमिनचा डोस पवार शिवसेनेला पुरवत आहेत. दुसऱयाला ट्रप लावण्याच्या नादात स्वतः भाजप ट्रपमध्ये अडकली. राजकारणामध्ये नेहमी ’हातचा’ ठेवावा लागतो. यासाठी संयम आवश्यक आहे. भाजपने एकाच वेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांना अंगावर घेतले. काँग्रेसचा तर विरोधी पक्षनेता त्यांनी फोडला. तिघे मिळून आता  भाजपवर सूड उगवत आहेत. यापुढे राज्यपाल काय भूमिका घेतात यावर सत्तानाटय़ाचा दुसरा अंक सुरु होईल.      

Related posts: