|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मसोली येथे हत्तीने भिरकाविला पॉवर ट्रीलर

मसोली येथे हत्तीने भिरकाविला पॉवर ट्रीलर 

मळणी काढून ठेवलेल्या भाताचेही नुकसान

प्रतिनिधी/ आजरा

मसोली गावच्या हद्दीतील चांभारकी नावाच्या शेतात गुरूवारी रात्री घुसलेल्या हत्तीने शेतकऱयांचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील घराजवळ उभा करण्यात आलेल्या बिपीन कुंभार यांचा पॉवर ट्रीलर हत्तीने भिरकावून दिला असून मळून ठेवण्यात आलेली भाताची पोतीही विस्कटून टाकली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात धुमाकूळ घालत असलेला हा हत्ती गेल्या आठ-दहा दिवसांपासून चित्री धरण परीसरातील इटे, खानापूर, देऊळवाडी परीसरात ठाण मांडून होता. गुरूवारी रात्री हत्तीने पुन्हा पश्चिम भागाकडे मोर्चा वळविला. कुंभार यांनी भात कापणी करून मळणी केलेल्या भाताची पोती शेतातील घरासमोर असलेल्या व्हरांडय़ात ठेवली होती. हत्तीने घराच्या दारातील पॉवर ट्रीलर एका बाजूला भिरकावून देण्याबरोबरच व्हरांडय़ात ठेवण्यात आलेली भातपोतीही विस्कटून टाकल्याने भाताचे मोठे नुकसान झाले आहे.

याबरोबरच कुंभार यांनी भात मळणीसाठी शेतात ठेवलेल्या ताडपत्रीही हत्तीने फाडून टाकल्या आहेत. याशिवाय हत्तीने या परीसरातील राजाराम गुरव, प्रल्हाद गुरव, गुणाजी गुरव यांच्याही भात पिकाचे नुकसान केले आहे. याशिवाय आंबा तसेच काजूच्या झाडांचीही नुकसान केली असून वनविभागाने नुकसानीची भरपाई देण्याबरोबरच हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकऱयांनी केली आहे.

Related posts: