|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अयोध्याप्रश्नी निकालाचे सर्वधर्मियांनी स्वागत करावे

अयोध्याप्रश्नी निकालाचे सर्वधर्मियांनी स्वागत करावे 

जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी लागणार आहे.  न्यायालयाच्या निकालाचा गौरव करणे सर्वांचे कर्तव्य आहे. निकाल कोणाच्याही बाजूने लागल्यास सर्वधर्मियांनी त्याचे स्वागत करावे, खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे. सर्व समाज बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केली.

अयोध्या प्रकरणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाद्वारे निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सौहार्दतेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी पूर्वखबरदारीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकाऱयांनी शांतता बिघडविण्याचे काम कोणीही करू नये, असे आवाहन केले.

व्यासपीठावर शहर पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीसीपी यशोदा वंटगुडी, महापालिका आयुक्त जे. एच. जगदीश आदी उपस्थित होते. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत हिंदू व मुस्लीम समुदायाचे नेते, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निकालानंतरही सर्वधार्मियांनी सौहार्दता जपावी

 शहापूर विभाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी अयोध्या निकालाचा या भागात कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सर्व धर्माच्या नागरिकांनी दक्ष राहून शांतता राखूया, असे आवाहन केले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष लतीफखान पठाण यांनी बेळगावची जनता शांततेला प्राधान्य देणारी असल्याचे सांगितले. निकाल कोणत्याही बाजूने लागल्यास शांतता राखावी, असे आवाहन केले. संपूर्ण जगाचे लक्ष या निकालाकडे लागले असून हिंदुस्थानचा मुसलमान जो निकाल येईल तो स्वीकार करेल, असे वक्फ बोर्डाचे चेअरमन अब्दुल गफार घीवाले यांनी सांगितले. दरम्यान निकालादिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्याची मागणी केली. माजी महापौर विजय मोरे यांनीही विचार मांडले. जिल्हय़ात पूर परिस्थितीवेळी सर्व जाती, धर्म आणि भाषाभेद विसरून मदत करण्यात आली आहे. निकालानंतरही सर्वधर्मियांनी अशीच सौहार्दता जपावी, असे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील, फजलखान पठाण यांच्यासह अन्य उपस्थितांनी विचार मांडले. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सोशल मीडियाद्वारे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. निकालाकडे केवळ निकाल म्हणून पहावे, कोणाच्या बाजूने अथवा विरोधात याची चर्चा करू नये, शांतता बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱया संदेशांची देवाणघेवाण करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुखांनी केले. शहर पोलीस आयुक्त एस. बी. लोकेशकुमार यांनी जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.

 एसीपी बरमणी यांनी स्वागत केले तर डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी आभार मानले.

 

Related posts: