|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उचगावचा जवान पुंच्छमधील गोळीबारात हुतात्मा

उचगावचा जवान पुंच्छमधील गोळीबारात हुतात्मा 

बेळगाववर शोककळा, आज दुपारी होणार अंत्यसंस्कार : अरगन तलावापासून पार्थिवाची मिरवणूक

वार्ताहर/ उचगाव

जम्मू-काश्मीरमधील पुंच्छ भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीवेळी गोळी लागून अवघ्या 22 वर्षांचा उचगावचा जवान हुतात्मा झाला. यामुळे उचगाव गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. राहुल भैरू सुळगेकर असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात राहुल यांना गोळी लागली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सुभेदार मेजर दयानंद धाली यांनी राहुलचे वडील भैरू यांना राहुलला गोळी लागल्याचे तर पहाटे तो हुतात्मा झाल्याचे वृत्त फोनवरून कळविले. हे वृत्त कानी पडताच आई-वडील व कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सदर वृत्त थोडय़ाच वेळात गावात पसरल्याने नागरिकांनी मारुती गल्लीतील सुळगेकर कुटुंबीयांच्या घरासमोर गर्दी केली. अनेकांनी सुळगेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

वयाच्या 19 व्या वर्षी सैन्य दलात भरती

राहुल हा मारुती गल्ली, उचगाव येथील रहिवासी. त्याचे प्राथमिक शिक्षण उचगाव प्राथमिक सरकारी मराठी शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण मळेकरणी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर मराठा मंडळ कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 19 व्या वर्षी 4 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये तो भरती झाला. गेली चार वर्षे तो देशसेवेत होता. राहुल स्वभावाने शांत मात्र धाडसी वृत्तीचा होता. मळेकरणी हायस्कूलमध्ये असताना अनेक खेळांमध्ये तो पारंगत होता. त्यामध्ये धावणे प्रकारात आवर्जून सहभाग घ्यायचा.

सुळगेकर कुटुंबीयांतील पाच जण देशसेवेत

सुळगेकर कुटुंबाने तर देशसेवेचा विडाच उचलला आहे. राहुलचे वडील भैरू सुळगेकर हे माजी सैनिक आहेत. त्याचा मोठा भाऊ मयूरसुद्धा सैन्यामध्ये कार्यरत आहे. राहुलचे दोन चुलत भाऊ वसंत व हेमंत हेही सैन्यामध्ये देशसेवा बजावित आहेत. या अख्ख्या कुटुंबाने देशसेवेचे व्रत घेतले आहे.

उचगावातील तिसरा जवान हुतात्मा

उचगावमधील दीडशेच्या आसपास युवक देशसेवेत आहेत. यामधील यापूर्वी परशराम सुतार, परशराम शिवाजी जाधव व आता राहुल भैरू सुळगेकर हे तिघेही विवाहाआधीच हुतात्मे झाले आहेत. देशसेवेसाठी आपले प्राण त्यांनी गमविले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उचगावकरांना धक्का बसला आहे.

आज अंत्यसंस्कार

राहुल यांचे पार्थिव शनिवारी दुपारी 1 वाजता बेळगावात दाखल होणार आहे. त्यानंतर पार्थिव गावी नेण्यात येणार आहे. शनिवारी गावातील सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उचगाव येथील स्मशानभूमीत राहुलवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गणेशचतुर्थीमधील भेट ठरली शेवटची

गेल्या गणेशचतुर्थीला राहुल उचगावला आला होता. आपल्या कुटुंबीयांसमवेत त्याने मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला होता. गणेशोत्सव झाल्यानंतर तो परत देशसेवेसाठी गेला. पण गुरुवारी झालेल्या हल्ल्यात गोळी लागून तो हुतात्मा झाल्याने त्याची ही भेट अखेरची ठरली.

शनिवारी सकाळी अरगन तलाव सर्कलपासून अंत्ययात्रा निघणार आहे. ती बेळगाव-वेंगुर्लामार्गे उचगावला येईल. उचगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कचेरी गल्ली, सुरवीर गल्ली, मारुती गल्लीमध्ये राहुलच्या निवासस्थानी पार्थिव काहीकाळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर लक्ष्मी गल्ली, गांधी चौक, गणपत गल्ली, नागेशनगर मार्गे उचगाव स्मशानभूमीमध्ये दुपारी राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मूमधून शुक्रवारी दुपारी दोन वाजता पार्थिव श्रीनगर, चंदीगढ, दिल्ली असा प्रवास करून बेळगावला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts: