|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » सौरऊर्जेसह इतर पर्यावरणपुरक पर्याय

सौरऊर्जेसह इतर पर्यावरणपुरक पर्याय 

घरात आपण खूप वीज वापरतो. दिव्यांच्या माध्यमातून वीज जळत असतेच पण एसी, फॅन वा फ्रीजसारख्या उपकरणांमुळेही जास्तीची वीज वापरली जाते. सौरऊर्जा प्रकल्प, सोलार वॉटर हिटर व अन्य गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणपुरक घराची संकल्पना साकारता येते.

अजच्या काळात ऊर्जेचा वापर कमीत कमी करण्याची गरज निर्माण होत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आधी वीज कमीत कमी कशी वापरता येईल, याचा विचार करावा लागतो. पण याही पलीकडे जाऊन आपण आता शाश्वत अशा सौर ऊर्जा वापराचा पर्याय हमखास अवलंबू शकतो. याच्या वापरामुळे आपण मोफत वीज भविष्यकाळात वापरू शकतो आणि झालंच तर अतिरीक्त वीज सरकारी वीज पुरवठा मंडळाला विकताही येते.

सोलार वॉटर हिटर

सोलार किंवा सौर ऊर्जेच्या वापरावरचे सोलार वॉटर हिटर आज घरोघरी दिसतात. गॅस, इलेक्ट्रीक वॉटर हिटरवर हा पर्याय उपयुक्त आणि सुरक्षित मानला जातो. अर्थात सोलार वॉटर हिटरकरीता सुरूवातीला येणारा खर्च पाहून अनेकजण हा पर्याय स्वीकारत नाहीत. गॅस व इलेक्ट्रीकवरच्या गिझरच्या वापरामुळे आपण गॅस व वीज खूप वापरत असतो. त्याकरीता आपल्याला खर्च येतोच. तो सहसा आपण विचारात घेत नाही. सोलार वॉटर हिटरकरीता सुरूवातीला खर्च येत असला तरी दिर्घकालीन विचार करता हा हिटर सोयीचा ठरत असतो. त्याच अनुषंगाने आता सौर ऊर्जेचा वापर करून वीज वापरण्याची गरज अधोरेखीत होत आहे. सोलार पॅनल बसवून आपल्याला हवी तेव्हढी ऊर्जा वापरता येते. पर्यावरणदृष्टय़ा मदतीला येणारा हा पर्याय म्हटला जातो.

ऊर्जा, पाण्याचा कमीत कमी वापर

ग्रीन होम्सच्या संकल्पनेत ऊर्जा, पाणी कमीत कमी वापरणे आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पाण्याची नासाडी आज खूप मोठय़ा प्रमाणात होते आहे. ती थांबवायला हवी. आता पाण्याचा पुनर्वापर करता येण्याची सोय झाली आहे. किचन वा इतर वापराचं पाणी बागेला पुरवता येतं. म्हणजे बागेकरीता लागणारं अतिरीक्त पाणी वाचवता येतं. हे पर्याय पर्यावरणपुरक मानले जात असल्याने आपणही घरासाठी पर्याय वापरले तर दिर्घकाळासाठी पैशाची बचत नक्कीच करू शकतो. फक्त त्यादृष्टीने आपण गांभीर्याने विचारशील व्हायला हवं, हे नक्की.

नैसर्गिकरित्या घर ठेवा थंड

घरातले वातावरण थंड राहायचे असेल तर (काँक्रीटचे घर)छतावर टाइल्स घालता येतात. नाहीतर छत पांढऱया रंगाने रंगवून घेता येते. थर्माकॉल किंवा फॉल्स सीलिंगच्या माध्यमातून घर थंड ठेवता येतं. याचप्रमाणे एलइडी बल्बचा वापर, फाइव्ह स्टार अप्लायन्सेसचा उपयोग करता येतो. घरात उष्णता जास्त यायची नसेल तर दक्षिण-पश्चिम दिशेला खिडक्या, दरवाजे असता कामा नयेत. बाल्कनीत कॅनोपी वा इतर मार्गाने छत निर्माण करावे, ज्याने आत उष्णता येणार नाही. खिडक्यांना डबल ग्लेझड् काचांचा वापर करता येतो. अशाने घर नैसर्गिकरित्या आतून थंड राहील. त्यामुळे कृत्रिम थंडावा मिळवण्यासाठी आवश्यक (एसी, फॅनसारख्या)उपकरणांचा वापर तुलनेने कमी करता येईल.

सौर ऊर्जा प्रकल्प

 घरगुती विजेसाठी सोलार ऊर्जेसाठी सोलार पॅनेल छतावर व्यवस्थित बसवून घ्यावे लागतात. त्यानंतर त्याची नियमित स्वच्छता राखली की देखभाल खर्च येत नाही. 1 केडब्ल्यू ऑफग्रीडच्या सोलार पॉवर सिस्टमसाठी अंदाजे 70 हजार इतका खर्च येतो याअंतर्गत 4 एलइडी दिवे, 4 फॅन्स आणि 1 टीव्ही 4 तासापर्यंत पाहता येतो. तर 4 एलइडी दिवे, 3 फॅन्स व 1 फ्रीज वापरल्यास 4 तास आणि 4 एलइडी दिवे अधिक 2 फॅन्स व 1 टीव्ही वापरण्यासाठी 6 तास मिळतात. त्या तुलनेत 2 केडब्ल्यू ऑफ ग्रीड सोलार पॉवर सिस्टमसाठी साधारणपणे अंदाजे 1 लाख 40 हजारापर्यंत खर्च येतो. याअंतर्गत आपल्याला 8 एलइडी दिवे, 2 फॅन्स, 0.5 टन इन्वर्टर एसी 4 तास लावता येतात. तसेच 8 एलइडी दिवे, 2 फॅन्स, 1 कुलर व 1 फ्रीज लावण्याचा (6 तासासाठी) पर्याय आणि 8 एलइडी दिवे, 4 फॅन्स आणि 1 टीव्ही (12 तासासाठी) लावण्याचा पर्याय असतो. याखेरीज संपूर्ण घरासाठीही सोलार ऊर्जेचा वापर करून वीज वापरता येते. सुरूवातीला त्यासाठी खर्च जास्त येतो. त्यानंतर ठराविक नियमित देखभाल राखली की झालं. वर छतावर जागा मोठी असेल तर ऊर्जा घरासाठी वापरून पुन्हा सरकारी वीज मंडळाला विकताही येते.

ऊर्जा वापरातल्या दिव्यांचा विचार करूö

एलइडी दिवे हे नेहमीच्या रोजच्या वापरातील बल्बपेक्षा 80 टक्के कमी ऊर्जा जाळत असतात.

दिव्यांचे आयुष्य किती असते पाहा-

इनकाडेंसेंट बल्ब- 2 हजार तास

सीएफएल बल्ब- 8 हजार तास

एलइडी बल्ब- 30 हजार ते 50 हजार तास

 

Related posts: