|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरातील खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती सुरू!

शहरातील खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती सुरू! 

100 कोटीतील रस्त्याच्या कामांनाही प्रारंभ : महापौरांकडून कामाची पाहणी

प्रतिनिधी/ सांगली

महापालिका क्षेत्रातील खराब झालेले रस्ते दुरूस्त करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये सध्या प्रमुख मार्गाचा समावेश आहे. सिव्हिल हॉस्पिटल चौक ते राममंदिर चौक आणि राजवाडा चौक ते गांधी पुतळा हा रस्ताही दुरूस्त केला जात आहे. हे दोन्ही रस्ते दुरूस्त करत असतानाच 100 कोटीच्या कामातील अनेक रस्त्याच्या कामांनाही प्रारंभ करण्यात आला आहे. या रस्त्याचा दर्जा योग्य ठेवावा यासाठी स्वतः महापौरांनी या रस्त्याच्या कामांची पाहणी केली आहे.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत 100 कोटीची कामे गेल्या अनेक महिन्यापासून मंजूर झाली आहेत. परंतु कृष्णानदीला आलेल्या महापुरामुळे व विधानसभेच्या आचारसंहितेमुळे ही कामे थांबली होती. ही कामे तातडीने सुरू  करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते. त्यानुसार यातील बहुसंख्य कामांना प्रारंभ झाला आहे. यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते तसेच गटारी आणि इमारतीचा समावेश आहे.

  या सुवर्ण नगरोत्थान योजनेतून राज्यशासनाकडून 70 कोटी रूपये मिळणार आहेत. तर उर्वरित 30 कोटी रूपये हे महापालिका स्वनिधीतून वापरणार आहे. अशा या 100 कोटीच्या निधीतून  178 रस्ते होणार आहेत. याची सर्व साधारण लांबी 89 किमी. आहे. अंदाजे 53 कोटी किंमतीचे हे रस्ते होणार आहेत. त्याबरोबरच  69 गटारीचे कामे करण्यात येणार आहेत. त्याची लांबी जवळपास 31 किमी आहे. याचा अंदाजे खर्च 14 कोटी आहे. याशिवाय शहरात मोठय़ा 10 इमारती निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सभागृह, स्टेडीयम, मार्केट, भाजी मंडई, वारकरी भवन ही कामे असून त्याची अंदाजे किमंत 23 कोटी आहे. याशिवाय शहरात विविध भागात चार दहनभूमीची कामे असून त्याची अंदाजे रु. 2.36 कोटी किंमत आहे. तसेच तीन ड्रेनेज कामे आहेत. त्याची लांबी साडेसहा किमी आहे.  तीन कोटी रूपयांची ही कामे आहेत. तसेच एक पाणी पुरवठा काम आहे. अशी एकूण 265 कामे  होणार आहेत.

 ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याकामी मक्तेदार यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत.  व त्याच बरोबर संबंधीत अभियंत्यांना गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टिने प्रत्येक कामांचा आढावा व तपासणी स्वत: आयुक्त कापडणीस हे जागेवर जावून करणार आहेत. या बाबत सर्व मक्तेदारांना सुचित केले आहे.

महापौरांकडून कामाची पाहणी

महापौर सौ. संगीता खोत यांनी स्वतः शहरातील रस्त्याच्या कामांची पाहणी केली. तसेच दर्जेदार काम करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना त्यांनी दिल्या आहेत. शहरातील सर्व रस्ते चकाचक करत असताना त्याचा योग्य दर्जा राखला गेला पाहिजे असा आदेश त्यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी स्टेशन चौक येथील रस्त्याच्या कामांची पाहणी केली. याठिकाणी या रस्त्याला डहाळ ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या रस्त्यावर पाणी थांबून राहू नये याची काळजीही घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

Related posts: