|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खुर्चीचा हव्यास नाही

खुर्चीचा हव्यास नाही 

वार्ताहर/ सावंतवाडी

मला पदाचा, खुर्चीचा हव्यास नाही. मी समाजसेवा, लोकांसाठी कार्य करत आहे. ते माझे कर्तव्य आहे. मी नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केलेला नाही आणि कधीच करणार नाही. मी सर्वांना विश्वासात घेऊनच काम करत आहे, असे प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी कोरगावकर यांच्यावर नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला, अडगळीत नेऊन ठेवली, असा आरोप केला. ते सर्व आरोप कोरगावकर यांनी फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, या पालिकेत लोबो ज्येष्ठ सदस्या आहेत. त्या मला विकासकामाच्या दृष्टीने सहकार्य, मार्गदर्शन करण्याचे सोडून नको तो मुद्दा चर्चेला का आणत आहेत? मी जे काही केलेच नाही त्याबाबत बोलले जात आहे. मी नगराध्यक्षपदाचा मान राखत आहे, राखला आहे. अडीच वर्षांच्या काळात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माझा सन्मान राखला. त्यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी प्रभारीपद घेतल्यानंतर त्यांचे मार्गदर्शन कामी आले आहे. साळगावकरांचा सन्मान मी राखला आहे. पुढेही तेच माझे मार्गदर्शक असणार आहेत. माझ्यावर प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी आली तेव्हा मी माझी खुर्ची मी घेऊन बसले.

खुर्चीचा मान, अडगळीत नाही!

कोरगावकर म्हणाल्या, नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये मी बसताना फोन वगैरे घेताना नगराध्यक्षांची खुर्ची डाव्या बाजूला ठेवणे उचित नव्हते. त्यामुळे खुर्ची सुरक्षित राहावी, म्हणून उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये सुस्थितीत ठेवली. मुळीच अडगळीत ठेवली नाही. याचा नाहक बाऊ केला जात आहे. मला कधीच खुर्चीचा मोह नाही. खुर्चीच कशाला, बाकडय़ावर बसूनही काम करेन. शहराचा विकास हेच माझे ध्येय आहे. मला राजकारण करायचे नाही. माझी केबिन नेहमीच खुली आहे. मी कुणाला अडवलेले नाही. मी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही, असे म्हणतात. मात्र, पाणीपुरवठाप्रश्नी सभापती सुरेंद्र बांदेकर यांना केबिनमध्ये बोलावून बैठक घेतली.

अडीच कोटी आणणारच!

कोरगावकर म्हणाल्या, मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी निधी मागितला होता. त्यांनी अडीच कोटी मंजूर केले होते. त्यानंतर त्या निधीबाबत पाठपुरावा केला गेला नाही. मी मुंबईत जाऊन पाठपुरावा करून निधी आणेन. लोबो यांनी त्याची चिंता करू नये.

Related posts: