हाँगकाँगमध्ये पुन्हा संघर्ष

खासदारांना अटक, निदर्शकांची तोडफोड
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
लोकशाही समर्थक खासदारांच्या अटकेमुळे नाराज झालेल्या हाँगकाँगमधील निदर्शकांनी मेट्रोस्थानक आणि शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड केली आहे. प्रत्यार्पण विधेयकावरून सुरू असलेले हे निदर्शन आता स्वतःच्या 6 व्या महिन्यात पोहोचले आहे.
निदर्शकांनी मेट्रो स्थानकावरील खिडक्यांची तोडफोड करत तिकीट यंत्राचे नुकसान घडवून आणले आहे. निदर्शकांना रोखण्यासाठी मोठय़ा संख्येत जवान तैनात करण्यात आले होते. तर दुसऱया एका घटनेत सुमारे 36 निदर्शकांनी उत्तर पश्चिम जिल्हय़ाच्या एका शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड केली आहे. काही निदर्शकांनी मॉलच्या खिडक्यांच्या काचा फोडत रेस्टारँटमधील टेबलांची नासधूस केली आहे. पोलिसांनी 4 पुरुष आणि एका महिलेला तोडफोड प्रकरणी अटक केल्याचा दावा एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.
पोलिसांनी प्रत्यार्पण विधेयक विषयक बैठकीत स्थानिक प्रतिनिधिगृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 6 खासदारांना शनिवारी अटक केली होती. या खासदारांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल निदर्शकांनी शोक व्यक्त केल्याच्या दुसऱया दिवशी या खासदारांना अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून डागण्यात आलेल्या अश्रूधूरापासून वाचण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी पार्किंग गॅरेजमधून कोसळला होता.