|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण तहसीलदारांची वाळू व्यावसायिकांना तंबी

चिपळूण तहसीलदारांची वाळू व्यावसायिकांना तंबी 

प्रतिनिधी/ चिपळूण

बेकायदा वाळू उत्खनन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी वाळू व्यावसायिकांना दिला आहे. बेकायदा वाळू उत्खननाबाबत ‘तरूण भारत’ने वृत्त प्रसिध्द करतानच त्यांनी या व्यावसायिकांना कार्यालयात बोलावून ही तंबी दिली.

  ड्रेझर व हातपाटीने वाळू उत्खनन करण्याची परवानगी दोन महिन्यांपूर्वीच संपली आहे. असे असतानाच गेल्या काही महिन्यांपासून दोणवली सुतवी बंदर व चिवेलीसह अन्य भागात मोठय़ाप्रमाणात हातपाटीने वाळू उत्खनन केले जात आहे. ही गावे ग्रामीण असल्याने येथे सहजासहजी प्रशासकीय यंत्रणा पोहचत नसल्याने त्याचा फायदा येथील व्यावसायिक घेत आहेत. त्यातच गेला दीड महिना यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने त्याचाही फायदा उठवला गेला. याचा व्यावसायिकांना फायदा होत असला तरी शासनाचा हजारो रूपयांचा महसूल बुडवला जात आहे.

  यावर ‘तरूण भारत’ने वृत्त प्रसिध्द करताच तहसीलदार सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तालुक्यातील सर्व वाळू व्यावसायिकांना कार्यालयात बोलावून सध्या वाळू उत्खननाला परवानगी नसल्याने कोणीही बेकायदा उत्खनन व वाहतूक करू नये. तसे करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस सर्वठिकाणचे बेकायदेशीर उत्खनन बंद ठेवण्यात आले आहे.

 ड्रेझर व्यावसायिकांना अभय का?

  गेल्या अनेक वर्षापासून ड्रेझर व्यावसायिकांना प्रशासकीय पातळीवरून अभय मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याला एका बडय़ा राजकारण्याचा त्यांच्या डोक्यावर असलेला हात महत्वाचा मानला जात आहे. सध्या वाळू उत्खननाची परवानगी संपली असतानाही जिल्हा प्रशासनने डिसेंबर महिन्यापर्यंत वाहतूक करण्याची परवानगी ड्रेझर व्यावसायिकांना दिली आहे. त्यामुळे अनेकजण विनापास वाहतूक करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र त्यांची वाहने तपासून कारवाई करण्याची हिम्मत कोणताही अधिकारी दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related posts: