|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कालुस्तेत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला!

कालुस्तेत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला! 

वार्ताहर/ चिपळूण

तालुक्यात हातपाटी वाळूवर बंदी असतानाही वाळू माफियांकडून छुप्या पध्दतीने वाळूची चोरी केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कालुस्ते येथे महसूलच्या भरारी पथकाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर शनिवारी रात्री पकडला असून दीड ब्रास वाळूसह तो डंपर जप्त करण्यात आला आहे. या डंपर मालकाला 76 हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

   गेल्या काही दिवसांपासून दाभोळ खाडीत हातपाटीद्वारे मोठय़ाप्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू होते. प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्याचा गैरफायदा घेत काही वाळू माफियांनी चोरटय़ा मार्गाने वाळू वाहतूक जोमाने सुरू ठेवली होती. याबाबत वृत्तपत्रांमधून आवाज उठल्यानंतर त्याची दखल येथील तहसीलदारांनी घेतली. तसेच होणारी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी मंडल अधिकारी व तलाठय़ांना सूचना दिल्या होत्या. तसेच अधिकाऱयांची भरारी पथकेही नेमली होती. तरीही काहीठिकाणी अवैध वाळू वाहतुकीची ओरड होत होती.

  त्यामुळे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी गिजीवार, तलाठी जाधव, समीर शेटय़े, प्रसन्न शेटय़े आदींच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री 9.30 वाजता कालुस्ते येथे धडक दिली. कालुस्ते लंडन रोडवर पहाणी करताना एका डंपरमध्ये अवैध वाळू साठा आढळून आला. त्यानुसार डंपर मालक अन्वर जबले यांना दीड ब्रास वाळू चोरीपोटी 76 हजाराचा दंड करण्यात आला आहे. तसेच डंपरही जप्त करण्यात आला आहे. यापुढेही भरारी पथकाची मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार शेजाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, या कारवाईमुळे तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक व उत्खनन होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related posts: