|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राजू कागे यांचा भाजपला रामराम

राजू कागे यांचा भाजपला रामराम 

उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : कागवाडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता

प्रतिनिधी/ बेंगळूर

आपण मानसिकदृष्टय़ा भाजपपासून दूर गेलो आहे. उद्या (मंगळवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन 13 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करेन, अशी घोषणा भाजप नेते आणि बेळगाव जिल्हय़ातील कागवाडचे माजी आमदार राजू कागे यांनी केली आहे.

पोटनिवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर राजू कागे यांनी काँग्रेसप्रवेशाची घोषणा केल्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. काँग्रेसने त्यांना कागवाडमधून पक्षाचे तिकीट देण्याची ग्वाही दिल्याचे समजते. अपात्र आमदार श्रीमंत पाटील यांना कागवाडमधून तिकीट देण्यासाठी भाजपने हालचाली केल्यामुळे राजू कागे यांना हा निर्णय घेतला आहे. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना कागे यांनी मागील दोन दिवसांपासून ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली आहे. काँग्रेसचे तिकीट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे कागे म्हणाले.

आपल्याला येडियुराप्पा यांनी निगम अथवा महामंडळाचे अध्यक्षपद देण्यास सांगून पोटनिवडणुकीत श्रीमंत पाटील यांना निवडणून आणण्याची जबाबदारी स्वीकारण्याची सूचना दिली होती. यापूर्वी आपण श्रीमंत पाटील यांच्याविरोधात प्रचार केला होता. आता त्यांच्या विजयासाठी प्रचार करणे योग्य नव्हे. आपणे तसे येडियुराप्पा यांना देखील सांगितले. आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला मुख्यमंत्रिपद दिले तरी आपण भाजपात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: