|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दररोज दीड कोटी लिटर सांडपाणी नदीत!

दररोज दीड कोटी लिटर सांडपाणी नदीत! 

प्रक्रिया प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष :

प्रतिनिधी/ सांगली

तीन तालुक्यातील नदीकाठच्या 52 गावातील सुमारे दीड कोटी लीटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याकडे गावांनी दुर्लक्ष केल्याने हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात जिल्हय़ात केवळ 33 गावांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविले आहेत. तर 14 गावांनी प्रशासनाने मंजुरी देऊनही प्रकल्प राबविले नसल्याने ते रद्द करण्यात आले आहेत.

  गेल्या दोन महिन्यांपासून जलजन्य किटकांमुळे होणाऱया आजारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. घरोघरी थंडी, ताप, सर्दी खोकल्याचे रूग्ण आढळू लागले आहेत. गावांना पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोतच दूषित झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच ते दहा वर्षापासून बंद असलेल्या कुपनलिकांना पाणी सुरू झाले आहे. तर गावांना पाणीपुरवठा करणाऱया विहिरी आणि कुपनलिकांच्या पाण्यात दूषित पाणी मिसळू लागल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भात आरोग्य, पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत विभागाकडील अधिकारी कर्मचाऱयांमार्फत पाणवठय़ांचे सर्वे करण्याचे आदेश दिले होते.

 गावात निर्माण होणारे सांडपाणी हे दूषित पाणीपुरवठय़ाचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सांडपणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर केले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींना अगदी कमी खर्च करावा लागतो. तर बहुतांशी खर्चाचा वाटा शासन अनुदान रूपात देते. गावात निर्माण होणारे सांडपाणी तसेच उघडय़ावर न सोडता त्यावर प्रक्रिया करून गावातील वृक्षलागवड अथवा शेतीला पाणी देता येते. गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी प्रत्येकी वीस ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. तीन वर्षातील 70 ग्रामपंचायतींपैकी 55 गावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील केवळ 33 कामे पूर्ण झाली असून तब्बल 14 गावांचे प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. तर केवळ आठ गावांत कामे सुरू आहेत. सांडपाणी प्रक्रियेबद्दल असणारी अनास्था ही नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारी ठरू लागली आहे.

 सांगलीचा शेरीनाला कृष्णेच्या प्रदूषणात मोठा वाटा उचलतो. त्यामुळे आजपर्यंत कृष्णा प्रदूषण आणि शेरीनाला यांचे समीकरणच बनले आहे. पण, या सर्वांपेक्षा मोठा धोका ग्रामपंचायतीच्या सांडण्याचा असल्याचे पुढे आले आहे. मिरज, वाळवा आणि पलूस तालुक्यातील तब्बल 52 गावांतील दीड कोटी लीटर सांडपाणी कृष्णा आणि वारणेत मिसळत असल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या एका पहाणीत पुढे आले आहे. या गावांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पुढकार घेण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही केवळ बघ्याची भूमिका न घेता सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Related posts: