|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिक्षकाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण

शिक्षकाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण 

24 तासांच्या आत तालुका पोलिसांनी केले आरोपींना जेरबंद

प्रतिनिधी/ सोलापूर

   शेतीच्या व्यवहारातून तेलगाव सीना येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शांतप्पा हेगोंडे (वय 45, रा. सहयोग नगर, जुळे सोलापूर) यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. घटनेनंतर 24 तासांच्या आत तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन अपहरणकर्त्या चौघांना जेरबंद केले आहे. कर्नाटकातील विजयपूर जिह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावच्या परिसरात शिक्षकाला डांबून ठेवण्यात आले होते.

   शिक्षक शांतप्पा हेगोंडे यांना सोमवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास चार अज्ञातांनी मारहाण करून अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी देखील तेलगाव येथे भेट देवून तपास करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर बसवण्णा मलकण्णा शटगार (रा. हिळ्ळी, ता. अक्कलकोट) यांच्याबरोबर शिक्षक हेगोंडे यांच्यामध्ये शेतीच्या व्यवहारातून वाद झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने इंडी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांचे पथक पाठविले. या ठिकाणी पोलिसांनी शिक्षक हेगेंडे यांची अपहरणकर्त्यापासून सुरक्षित सुटका केली. येथून पोलिसांनी बसवण्णा शटगार, त्यांचा मुलगा संगप्पा शटगार, सागर शटगार (रा. हिळ्ळी, ता. अक्कलकोट), आणि योगेश हनमंत बाके (रा. मोदीखाना, गणपती मंदिराजवळ) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गुह्यात वापरलेली दोन दुचाकी आणि शिक्षक हेगोंडे यांची दुचाकी जप्त केली आहे. सीना तेलगाव येथून तब्बल शंभर किलोमीटर अंतर शिक्षक हेगोंडे यांचे अपहरण करून लच्याण येथे नेण्यात आले होते.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक फौजदार शेख, पोलीस नाईक कोणदे, पोलीस नाईक कोरे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पवार, असिफ शेख, बिराजदार, फडतरे यांच्या सायबर पोलीस स्टेशनकडील कर्मचाऱयांनी केली. 

त्या चिमुरडीमुळे घटनेला फुटली वाचा

शिक्षक शांतप्पा हेगोंडे आणि बसवण्णा शटगार यांच्यामध्ये शेतीच्या व्यवहारातील पैशाच्या कारणावरून वाद होता. पाच ते सहा वर्षापासून हेगोंडे हे पैसे देत नसल्यामुळे शटगार यांनी हेंगोडे यांचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. चौघे जण हे हेगोंडे ज्या गावामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस आहेत, त्या तेलगावामध्ये आले. यावेळी शाळेच्या कामावरून हेगोंडे बाहेर जात होते. चौघांनी त्यांना तेलगाव ते डोणगाव जाणाऱया रोडवर अडवून मारहाण करून गाडीवर बसवले. यावेळी शिक्षक हेगोंडे यांनी मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला. शिक्षक हेगोंडे यांचा आवाज शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱया मुलीने ऐकला आणि हा प्रकार शाळेमध्ये जावून इतर शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर तपास कामाला सुरूवात झाले.

 – शिक्षक हेगोंडे यांचे अनेकांशी व्यवहार

शिक्षक हेगोंडे यांनी चार ते पाच जणांना शेतीच्या जागेचा व्यवहार केला आहे. जागेच्या व्यवहारातून फसवणूक केल्यासंदर्भात त्यांच्या विरोधामध्ये अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे. या प्रकरणामध्ये शटगार यांची देखील फसवणूक झाल्यानंतर त्यांनी शिक्षक हेगोंडे यांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे.

Related posts: