|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निमसोडच्या कुस्ती मैदानात पंजाबचा गौरव मच्छवाला प्रथम विजेता

निमसोडच्या कुस्ती मैदानात पंजाबचा गौरव मच्छवाला प्रथम विजेता 

प्रतिनिधी/ वडूज

निमसोड (ता. खटाव) येथे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदानास मल्ल व रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अंतिम कुस्तीसह महत्वाच्या अन्य कुस्त्या भारतीय मल्लांनी चटकदार कामगिरी करत इरानी मल्लांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. साडेतीन लाख इनामाच्या अंतिम कुस्तीत पंजाबच्या गौरव मच्छीवालाने नागपट्टी डावावर हरियाणाच्या पै. मोराडी यास चितपट केले. ही कुस्ती सुमारे 45 मिनीटे चालली होती. पहिला अर्धा तास एकमेकांचे बळ आजमावण्यात गेला. शेवटच्या निर्णायक क्षणी मच्छीवालाने मोराडीला घुटना लावत उचलले. व त्यानंतर नागपट्टी करत अस्मान दाखविले. हिंदकेसरी विकास जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. द्वितीय क्रमांकाच्या अडीच लाख इनामाच्या कुस्तीत दिल्लीचा उमेश मथुरा याने छडी टांग लावत माऊली जमदाडेस अस्मान दाखविले. तृतीय क्रमांकाची भारत मदने याने इरानचा पै. पैमान यास पोकळ घिस्सा लावत चितपट करुन दोन लाखाचे इनाम जिंकले. राहुल सरक कोल्हापूर व अकलूजच्या शिवनेरी तालमीचा पै. उमेश शिरतोडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. बेनापूर तालमीच्या अनिल धोत्रे याने पुणे पोलीस दलाच्या शंकर बनगरवर मात करत 1 लाखाचे बक्षीस जिंकले. याशिवाय कुंडलच्या क्रांती कारखान्याचा संभाजी कळसे विरुध्द सतिश मुंढे आटपाडी, जाखनगांवचा प्रशांत शिंदे विरुध्द पै. तानाजी वीरकर आटपाडी, रामदास पवार पारगांव विरुध्द पै. वरुणकुमार दिल्ली, पृथ्वीराज पाटील मांडवे विरुध्द अमित गायकवाड अकलूज यांच्यातील कुस्त्यांनी प्रेक्षकांचे पारने फेडले. तर ऐनवेळी जोडण्यात आलेल्या महिलांच्या कुस्त्याही चांगल्याच रंगतदार झाल्या. पै. विकासतात्या यांच्यासह ऍड. सुभाषराव देशमुख, हणमंत महाडीक, आण्णा घाडगे, राजाराम मोरे, गुरुनाथ देशमुख, शिवाजी घाडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले. शंकरराव पुजारी कोथळीकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

 

Related posts: