|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘भरत’ हे माझे माहेर : लीला गांधी

‘भरत’ हे माझे माहेर : लीला गांधी 

     भरत नाटय़ मंदिर, संवाद पुणे आयोजित पहिल्या संगीत नाटय़ संमेलनाचा समारोप

ऑनलाईन टीम / पुणे :

 माझ्या नाटकाची सुरुवात जयराम शिलेदार यांच्या ‘कवीराय रामजोशी’ या नाटकातून भरत नाटय़ मंदिरातील रंगमंचावर झाली. भरतमधील रंगदेवतेने मला भरभरुन आशीर्वाद दिले. परमेश्वर कृपेने मला भरत नाटय़ संशोधन मंदिराने डोक्यावर घेतले. कलेच्या बाबतीत हे माझे खऱया अर्थाने माहेर आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केल्या. 

शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या भरत नाटय़ संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या संगीत नाटय़ पहिल्या नाटय़-तंत्रज्ञ आणि मराठी नाटय़संगीत महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार निर्मला गोगटे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी गांधी या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या.

भरत नाटय़ संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, विश्वस्त मिलिंद लेले, रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे तसेच संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे व्यासपीठावर होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते पडद्यामागील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे प्रमुख सुनील मते, तसेच भरत नाट्य मंदिरातील तंत्रज्ञ विठ्ठल हुलावळे, रामचंद्र धावारे, जितेंद्र सुतार, अभिजीत गायकवाड, विलास गाडगीळ, महादेव हेरवाडकर, सुधीर फडतरे, विनायक (दादा) कापरे, सातारा नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. शास्त्रीय गायनात प्रथम आलेल्या सर्वेश मांडे या बालकलाकाराचा सत्कार या वेळी गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.

निर्मला गोगटे म्हणाल्या, संगीत हे नाटकाचा अपरिहार्य भाग आहे. भरत नाटय़ मंदिराने संगीत नाटकाची परंपरा सांभाळली या बद्दल मी त्यांचे कौतुक करते. हा रंगमंच सृजनशिल आहे. येथे स्वरयज्ञ फार मोठय़ा प्रमाणात झाले. त्यामुळे भरत नाट्य मंदिराविषयी मला खूप आपुलकी आहे, असेही त्या म्हणाल्या.

Related posts: