|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार 

संजय राऊत यांना विश्वास,

डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा सक्रिय

मुंबई / प्रतिनिधी

भाजपविरुद्ध शिवसनेनेच्यावतीने एकहाती किल्ला लढवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना बुधवारी यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्जनंतर राऊत यांनी पुन्हा सक्रिय होताना माध्यमांशी तितक्याच आक्रमकपणे संवाद साधत महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केला.

राऊत यांना डॉक्टरांनी शांत राहण्याचा तसेच काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत महायुती केली म्हणजे धर्मांतर केलेले नसल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा शब्द देऊनही तो भाजपने पाळला नाही. सर्वात मोठा पक्ष असून भाजपला सत्तास्थापनेत यश आले नाही. नंतर स्वत:ला सरकार स्थापन करता येत नाही म्हणून त्यांनी इतरांनाही सरकार स्थापन करू दिले नाही. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार ही अफवा असल्याचे सांगत तशी शक्यता राऊत यांनी फेटाळून लावली. राज्यपालांकडून अन्याय झाला असे वाटते का, अशी विचारणा केली असता राज्यपालांकडून सर्वांवरच अन्याय झाला आहे, असेही राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केली राऊत यांची विचारपूस

 सकाळी राऊत यांची राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि आमदार विश्वजित कदम यांनी राऊत यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Related posts: