|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » इराणच्या अब्दुल्लाकडून महाराष्ट्र केसरी चितपट

इराणच्या अब्दुल्लाकडून महाराष्ट्र केसरी चितपट 

प्रतिनिधी/वडूज

शितोळेनगर (निमसोड) ता. खटाव येथे माजी सरपंच कै. पै. आप्पासाहेब शितोळे यांच्या स्मरणार्थ आयोजन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात इराणच्या पै. अब्दुल इराणी याने महाराष्ट्र केसरी बाला रफीकला प्रंट सालतू डाव टाकत चितपट केले. संयोजक शितोळे परिवारातर्फे इराणी मल्लास 2 लाख 51 हजार रूपये इनाम देण्यात आले.

  द्वितीय क्रमांकाच्या 1 लाख 51 हजार रूपये इनामाच्या कुस्तीत नागाचे कुमठे येथील मल्ल मोठा पांडुरंग मांडवे यास पोकळ घिस्सा लावत पुण्याचे संदीप काळे याने अस्मान दाखविले. चतुर्थ क्रमांकाच्या 51 हजार इनामासाठी पुणेच्या बुचडे तालमीचा मल्ल सुबोध पाटील विरूद्ध संतोष पडळकर सातारा यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत कुंडलच्या संतोष बोराटेने पाय घिस्सा लावत पारगावच्या शरद पवारावर मात केली. तिसऱया क्रमांकाची 1 लाख रूपये इनामाची कुस्ती पै. प्रशांत शिंदे जाखणगाव विरूद्ध पै सचिन पवार खवसपूर यांच्यातील कुस्तीही रोमहर्षक झाली. मैदानास माजी सभापती संदीप मांडवे, भगवानराव गोरे, जयसिंगराव जाधव, प्रकाशशेठ नलवडे, काकासाहेब मोरे, धोंडीराम मोरे, शिवाजीराव देशमुख आदींसह परिसरातील शेकडो मल्ल व रसिकांनी हजेरी लावली होती. हिंदकेसरी विकास जाधव, पै. अर्जुन पाटील, संजय शितोळे, कुशीकराव शितोळे आदिंनी पंच म्हणून काम पाहिले. शंकर पुजारी कोथळीकर यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले. तर ताकवडे (इचलकरंजी) येथील विशाल कांबळे व सहकाऱयांच्या हलगी वादनाने मैदानास चांगलीच रंगत आणली. बेंगलोर बुलीयन रिफायनरीचे अध्यक्ष विजयशेठ शितोळे, सुभाष शितोळे व सहकाऱयांनी मैदानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related posts: