|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेना एनडीएतून बाहेर?

शिवसेना एनडीएतून बाहेर? 

एनडीएच्या बैठकीला जाणार नाही : शिवसेना खासदार संजय राऊत यांचे संकेत : संसदेत शिवसेना खासदार विरोधी बाकावर

प्रतिनिधी/ मुंबई

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएने आयोजित केलेल्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची आता औपचारिकताच बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एनडीए ही कुणाच्या मालकीची नाही. तेव्हाची एनडीए आणि आताची एनडीए यात फरक असल्याचे राऊत म्हणाले. एनडीएच्या स्थापनेत शिवसेनेचा पुढाकार होता. जॉर्ज फर्नांडीस हे तेव्हा एनडीएचे निमंत्रक होते. ते सर्व पक्षांना सोबत घेऊन निर्णय घ्यायचे. मात्र, आता तो संवादच राहिलेला नसल्याचे राऊत यांनी बोलताना शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का? असे विचारले असता राऊत यांनी माहित नसल्याचे सांगताना एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आम्हाला एनडीएतून दूर व्हावे लागत आहे. जर आम्ही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसता तर राज्यातील जनतेने आम्हाला कधीही माफ केले नसते, असेही राऊत म्हणाले. रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असल्याने एनडीएच्या बैठकीला कोणी जाणार नसल्याचे राऊत म्हणाले.

भाजपचे सेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचे कारस्थान : विनायक राऊत

भाजपकडून शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. भाजपने आम्हाला एनडीएच्या बैठकीचे आमंत्रणच दिले नाही तर राज्यसभेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आल्याचे आम्हाला समजले आहे. जर आसनव्यवस्था बदलली गेली तर संजय राऊत हे विरोधी बाकावर असतील. तर लोकसभेतही आसनव्यवस्था बदलली गेली तर आम्ही त्याचा स्वीकार करू, असे राऊत यांनी बोलताना लोकसभा अध्यक्षांनी बोलविलेल्या बैठकीचे आम्हाला आमंत्रण असून आम्ही त्याला जाणार असल्याचे राऊत म्हणाले.  

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. 2014 मध्ये विधानसभेला शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतरही केंद्रातील एनडीएमध्ये ती कायम होती. आता या अधिवेशनात शिवसेना भाजपसोबत असणार की विरोधात राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, भाजपसोबत सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेने जीएसटी तसेच अनेक महत्त्वाच्या विधेयकाला विरोध केला होता. त्यामुळे या अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Related posts: