|Friday, December 6, 2019
You are here: Home » Agriculture » नव द्राक्षबागायतदारांच्या प्रगतीचे स्वप्न भंगले..!

नव द्राक्षबागायतदारांच्या प्रगतीचे स्वप्न भंगले..! 

वार्ताहर / रमेश मस्के, सावळज

वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुण तर आधुनिक शेतीची कास धरलेला शेतकरी प्रगतीसाठी द्राक्षशेतीकडे वळु लागला होता. त्यानुसार शेतकऱयांनी नवीन द्राक्षबागेच्या रोपांची लागण केली होती. मात्र अवकाळी पावसाने द्राक्षांची रोपांच्या मुळ्या कुजुन बागेचे नुकसान झाले आहे. द्राक्षशेतीची सुरुवात करतानाच नव शेतकऱयांपुढे नुकसानीच्या संकटाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने द्राक्षांची नवीन रोपे कुजुन नुकसान झालेल्या बागांमुळे नव द्राक्षबागायतदारांच्या प्रगतीचे स्वप्न भंगले आहे. तरी या नुकसानग्रस्त लागणीच्या द्राक्षबागांचे पंचनामे करुन शेतकऱयांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तासगाव तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे शेतकऱयांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवुन केली आहे.

पारंपारिक शेती धोक्यात आलेने तरुण वर्ग हा नोकरीसाठी शहराकडे वळला होता. मात्र वाढती बेरोजगारीमुळे तरुण शेतकरी तर पारंपारिक पिकातुन पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने प्रगतीसाठी जेष्ठ शेतकरी ही पुन्हा आधुनिक शेतीकडे वळु लागला आहे. दाक्षपिक हे संवेदनाक्षम असले तरी इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारे पिक असल्याने शेतकऱयांचा मोठया प्रमाणात कल हा द्राक्षशेतीकडे असतो. त्यानुसार अनेक शेतकरी प्रगतीची स्वप्ने घेवुन द्राक्षेशेतीत उतरत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो एकर द्राक्षशेतीची लागवड होत आहे. मात्र चालुवर्षी अशा नवीन लागवड केलेल्या डॉग्रेज व कलम रोपानांही पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱयांच्या द्राक्षशेतीच्या प्रारंभालाच पावसामुळे मोठे आव्हान निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तासगाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नवीन द्राक्षबागेची लागण करण्यात आली पण सष्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा लागणीच्या बागांनाही फटका बसला आहे. पावसाचे पाणी लागवडीच्या बागेत साचुन राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांच्या मुळ्या कुजुन नुकसान झाले आहे. नवीन द्राक्षलागणीसाठी साधारणता एक एकर क्षेत्रात सुमारे 1200 रोपांची लागण होते. सुरुवातीला मार्चमध्ये डॉग्रेज रोपाची लागण करुन त्यावर ऑक्टोबर महिन्यामध्ये डॉग्रेज वेलीच्या खोडावर आवश्यक द्राक्षवाणाचे कलम केले जाते. अशा पध्दतीच्या द्राक्षबागासाठी सुमारे 50 ते 60 रुपये प्रति रोप लागणीचा खर्च येतो म्हणजे एकरी 60 हजार ते 70 हजार रुपये खर्च येतो. तर डायरेक्ट कलम केलेलीच नर्सरीच्या रोपांची लागण करायची झाल्यास सुमारे 110 ते 140 रुपये प्रति रोप प्रमाणे 1 लाख 40 हजार ते 1 लाख 70 हजारपर्यंत एकरी लागणीचा खर्च येतो. तसेच लागणीपासुन द्राक्ष उत्पादन मिळण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्षेचा कालावधी लागतो. मात्र चालुवर्षी तालुक्यातील नवीन लागणीच्या बागांचे मोठे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. या लागणीच्या कलम रोपांची मुळे कुजुन रोपे कुजु लागल्याने शेतकरी सैरभैर झाला आहे.

शेतकऱयांनी प्रगतीची स्वप्ने पाहुन लागण केलेल्या बागांचा खर्च व कालावधी पावसाच्या पाण्यात वाया गेला आहे. तसेच अगोदरच बँका व सोसायटय़ाकडुन कर्ज काढुन द्राक्षबागेचे आव्हान स्विकारले होते पण सुरुवातीलाच पावसाने फटका दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. आत्ता पुन्हा द्राक्ष लागण करण्यासाठी शेतकऱयांना कर्ज मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकऱयांचे प्रगतीचे स्वप्न भंगले आहे. तरी लागणीच्या द्राक्षबाग नुकसानीचे ही पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देवुन शेतकऱयांना आधार देण्याची गरज आहे.

लागणीच्या बागांचेही पंचनामे करा

पावसामुळे द्राक्षशेतीसह खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र लागणीच्या नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत नवीन लागणीच्या कलम द्राक्षबागांचे ही पावसाच्या पाण्याने रोपे कुजुन नुकसान झाले आहे तसेच दोनवर्षे ही वाया जाणार आहे. तरी अशा नुकसानग्रस्त बागांचे पंचमाने करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी तासगाव तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देवुन शेतकऱयांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी तासगाव तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव, सचिन पाटील, संजय पाटील, प्रफुल्ल माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related posts: