|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » मयांक, शमीची कसोटी क्रमवारीत झेप

मयांक, शमीची कसोटी क्रमवारीत झेप 

फलंदाजीत विराट दुसऱया स्थानी कायम, रोहितही टॉप-10 मध्ये

वृत्तसंस्था/ दुबई

इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने मिळवलेल्या दणदणीत विजयात मोलाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर मयांक अगरवाल यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. सामन्यात एकत्रित सात बळी घेणाऱया शमीने सातवे स्थान पटकावले आहे. मयांकनेही फलंदाजी क्रमवारीत अकरावे स्थान मिळवले आहे. याशिवाय, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपले दुसरे स्थान कायम राखले असून हिटमॅन रोहित शर्मा 10 व्या स्थानावर आहे.

आयसीसीची ताजी कसोटी क्रमवारी रविवारी जाहीर झाली. या कसोटी क्रमवारीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मयांक अगरवाल यांनी टीम इंडियाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. शमीने बांगलादेशविरुद्धच्या  पहिल्या डावात 3 तर दुसऱया डावात 4 बळी घेतले. या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत आठ स्थानाचा फायदा झाला असून तो आता सातव्या स्थानावर आहे. त्याचे आता 790 गुण झाले आहेत. विशेष म्हणजे, गुणांच्या बाबतीत भारताच्या कसोटी इतिहासात कपिल देव (877) आणि जसप्रीत बुमराह (832) यांना आठशे गुणांचा टप्पा ओलांडता आला आहे. यानंतर, अशी कामगिरी करणारा शमी हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अन्य भारतीय गोलंदाजामध्ये बुमराह तिसऱया स्थानी, आर.अश्विन 10 व्या, रविंद्र जडेजा 16 व्या, इर्शात शर्मा 20 व्या तर उमेश यादव 22 व्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 908 गुणासह पहिल्या स्थानी आहे.

फलंदाजीत विराटच अव्वल, मयांकलाही फायदा

बांगलादेशविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोच्च 243 धावांची खेळी करून सामनावीर ठरलेला मयांक अगरवालने फलंदाजी क्रमवारीत अकराव्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे 691 गुण आहेत. याशिवाय, कसोटी क्रमवारीत अव्वल दहा जणांमध्ये भारताचे चार फलंदाज आहेत. कर्णधार विराट कोहली दुसऱया, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्मय रहाणे पाचव्या आणि रोहित शर्मा हा दहाव्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने चार स्थानांची झेप घेत 35 वे स्थान मिळवले आहे. जागतिक फलंदाजामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 937 गुणासह पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱया स्थानी आहे.

अष्टपैलू क्रमवारीत विंडीजचा होल्डर अव्वल

आयसीसीने जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत विंडीजचा जेसॉन होल्डर पहिल्या स्थानी आहे. भारताचा जडेजा दुसऱया, इंग्लंडचा बेन स्टोक्स तिसऱया, आर. अश्विन चौथ्या तर आफ्रिकेचा फिलँडर पाचव्या स्थानी आहे.

 

आयसीसी फलंदाजी क्रमवारी –

  1. स्टीव्ह स्मिथ – 937 गुण
  2. विराट कोहली – 912 गुण
  3. केन विल्यम्सन – 878 गुण
  4. चेतेश्वर पुजारा – 790 गुण
  5. अजिंक्य रहाणे – 759 गुण

 

गोलंदाजी क्रमवारी –

  1. पॅट कमिन्स – 908 गुण
  2. कॅगिसो रबाडा – 839 गुण
  3. जेसॉन होल्डर – 814 गुण
  4. जसप्रीत बुमराह – 802 गुण
  5. जेम्स अँडरसन – 798 गुण

Related posts: