|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्राची पंजाबवर 45 धावांनी मात

महाराष्ट्राची पंजाबवर 45 धावांनी मात 

वृत्तसंस्था/ चंदीगड

येथे सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत महाराष्ट्राने पंजाबवर 45 धावांनी विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राने क गटात 20 गुणासह अव्वलस्थान मिळवत सुपरलीगसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. प्रारंभी, महाराष्ट्राने 20 षटकांत 4 बाद 201 धावा जमवल्या. यानंतर, विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला 7 बाद 156 धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (14) स्वस्तात बाद झाला. अनुभवी केदार जाधव (2) व नौशाद शेख (2), नाहार (38) यांनीही सपशेल निराशा केल्याने महाराष्ट्राची 4 बाद 90 अशी स्थिती झाली होती. पण, अझीम काझी व कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी पाचव्या गडय़ासाठी 111 धावांची भागीदारी साकारत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. काझीने 36 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारासह नाबाद 71 तर त्रिपाठीने 27 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह नाबाद 63 धावा केल्या. या जोडीमुळे महाराष्ट्राला 20 षटकांत 4 बाद 201 धावांचा डोंगर उभा करता आला.

महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना पंजाबला 7 बाद 156 धावा करता आल्या. पंजाबकडून कर्णधार मनदीप सिंगने सर्वाधिक 67 धावा केल्या. अनमोलप्रीत सिंगने 36 तर गुरकीरत सिंगने 18 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने पंजाबला 45 धावांनी हा सामना गमवावा लागला.

महाराष्ट्र 20 षटकांत 4 बाद 201 (नाहर 38, अझीम काझी नाबाद 71, त्रिपाठी नाबाद 63, कौल 2/31).

पंजाब 20 षटकांत 7 बाद 156 (मनदीप सिंग 67, अनमोलप्रीत सिंग 36, गुरकीरत सिंग 18, देशमुख 3/34, बच्छाव 2/22).

Related posts: