|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश 

प्रतिनिधी / कोल्हापूर

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर मंगळवारी 19 तारखेला माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दुपारी बारा वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीला बैलगाडी मध्ये शेतकर्‍यांचा आक्रोश आणि व्यथा मांडणारे फलक लावले होते. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. मोर्चात सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यामध्ये महिला शेतकर्‍यांची संख्याही उल्लेखनीय होती. पोलिसांनी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आमदार संपतबापू आणि पोलिसांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. संतप्त शेतकर्‍यांनी आक्रोश व्यक्त करीत प्रवेशद्वाराला धडक दिली. या धडकेत कार्यालयाच्या लोखंडी दरवाज्याचं कुलूप व साखळदंड तुटला. धक्का देत प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न करताना शेतकरी व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या आवाहनानंतर आंदोलक शांत झाले. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी शेतकर्‍यांना मूल्यांकन ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती बंदीचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबुराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार, अंबाजी पाटील, संतराम पाटील, राजेंद्र देशमाने, बाबासो देवकर, अमित कांबळे, सरदार पाटील यांच्यासह शेतकरी, शेतमजूर कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related posts: