‘इंटरकनेक्ट युजेस शुल्का’बाबत ट्रायचे संकेत

दूरसंचार कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता : कंपन्यांसह संबंधितांकडून मागविली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) ट्रायकडून (दूरसंचार नियामक प्राधिकरण) चालू महिनाअखेरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची संकेत वर्तविण्यात आले आहेत. याबाबत ट्रायच्या एका वरि÷ अधिकाऱयाने माहिती दिली. त्यामुळे वादास कारणीभूत ठरलेल्या शुल्काबाबत दूरसंचार कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ट्रायने यापूर्वीच एक जानेवारीपासून इंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत ट्रायने दूरसंचार कंपन्या आणि त्यांच्या संबंधितांकडे माहिती मागवली होती. त्याचबरोबर ट्रायकडून गेल्या आठवडय़ात सर्व दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आली होती. यात सर्व प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली होती.
जिओकडून ट्रायला इशारा
इंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) रद्द करण्याची मुदत पुढे ढकलल्यास नि:शुल्क व्हॉइस कॉलची सुविधा बंद करावी लागेल व त्यामुळे दरवाढीवर परिणाम होईल. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असा इशारा मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओकडून ट्रायला देण्यात आला आहे.
व्होडाफोन-आयडियाची डिसेंबरपासून दरवाढ…
व्होडाफोन-आयडियाकडून 1 डिसेंबरपासून मोबाईल सेवाशुल्कात दरवाढ केली जाणार आहे. या कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. थकीत परवाना व स्पेक्ट्रम शुल्कापोटी कंपनीला केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपये जमा करायचे आहे. ग्राहकांना यापुढेही जागतिक दर्जाची डिजिटलसेवा देण्यासाठी कंपनी 1 डिसेंबरपासून आवश्यक ती दरवाढ करणार आहे. मार्च 2020 पर्यंत भारतात ग्राहकसंख्या 100 कोटींवर पोहोचेल, असा विश्वास कंपनीने पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.