|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात

50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात 

एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतीलप्रकाश जावडेकर

50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह भारतीय सिनेसृष्टीतले दिग्गजांची उपस्थिती

महोत्सवात 76 देशातल्या 200 चित्रपटांचा आनंद घेता येणार

50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात शानदार कार्यक्रमाने प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, सिनेसृष्टीतले महानायक म्हणून ज्यांचे योगदान ओळखले जाते असे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दिग्गजांची उपस्थिती, शंकर महादेवन आणि जॅझचे दैवत मानले जाणारे लुई बॅन्कस्यांचे बहारदार संगीतमय सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांनी गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेला हा उद्घाटन सोहळा रंगतदार ठरला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले.

https://youtu.be/YWqag0ZKIxI

एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतील, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात अनेक सुंदर स्थळे आहेत. चित्रिकरणासाठी पंधरावीस परवानग्या घ्याव्या लागतात. ही परिस्थिती बदलावी, यासाठी एक खिडकी योजनेचे काम सुरु असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले. गोवा, लेहलडाख, अंदमाननिकोबार यासारख्या स्थळांना त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्याची आणि चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्याची क्षमता चित्रपट या माध्यमात आहे. चित्रपटांनी आपले जीवन समृद्ध केले, भारतीय चित्रपटांची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. दृष्टीबाधितांनाही चित्रपटाचा संपूर्ण आनंद घेता यावा, यासाठी गोव्यातील युवकांनी निर्मिती केलेल्या एका चित्रपटातील विना संवादांच्या दृष्यांदरम्यान पडद्यावरच्या घडामोडी कथन करणारे निवेदन सादर करण्याचे युवकांनी ठरवले आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे, असे जावडेकर म्हणाले. यासाठी माफक खर्च येत असून, चित्रपट जगत ही संवेदनशीलता घेऊन वाटचाल करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

महोत्सवाच्या उद्घाटनाच्या या मंचाने जागतिक चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांना एकत्र आणले असल्याचे अमित खरे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रख्यात अभिनेते, भारतीय चित्रपट क्षेत्राचे थलैवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबीली ॲवॉर्डने गौरवण्यात आले. चित्रपटअभिनेते अमिताभ यांचा उल्लेख आपले स्फूर्तीस्थान असा करुन हा पुरस्कार आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह आपल्या चाहत्यांना समर्पित करत असल्याचे रजनीकांत यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्ताने यावेळी एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले. आईवडिलांचा आर्शिवाद आणि जनतेचे सर्वात मोठे आभार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी जनतेने साथ दिली, त्यांचे ऋण आपल्यावर आहे, या ऋणात आपण राहु इच्छितो, असे ते म्हणाले.

या महोत्सवात कंट्री ऑफ फोकस रशिया असून, रशियात या रशियन चित्रपटांचा आनंद घ्या, रशियात चित्रपट बनवा तसेच एकत्र येऊन सहयोगाने चित्रपट निर्मिती करण्याचे आवाहन रशियाच्या प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखांनी केले. कंट्री ऑफ फोकसरशिया मधे सर्व प्रकारच्या चित्रपटांचा आनंद घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे तसेच जगप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि इफ्फी आंतरराष्ट्रीय ज्युरी अध्यक्ष जॉन बेली, भारतीय ज्युरी अध्यक्ष प्रियदर्शन यांच्यासह चित्रसृष्टीतले अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

या महोत्सवात76 देशांमधले 200 हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात 26 फिचर फिल्म्स आणि 15 नॉन फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवात 10 हजारहून अधिक सिनेप्रेमी सहभागी होत आहेत. 28 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहिल. इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Related posts: