|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘ओडीएफ प्लस-प्लस’च्या प्रस्तावावर खोटी सही अन् शिक्क्याचा वापर

‘ओडीएफ प्लस-प्लस’च्या प्रस्तावावर खोटी सही अन् शिक्क्याचा वापर 

 

प्रतिनिधी/ वाई

‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ साठीचा पंचतारांकित मानांकनासाठी प्रस्ताव पाठवणे, जैवविविधता समिती स्थापन करणे आणि 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अनुदानातून कचरा व्यवस्थापनासंबंधी चर्चा करणे, यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभा सुरु झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणाच्या विषयांवर चर्चा सुरु झाल्यावर खोटय़ा सह्यावरुन सभागृहांत वाद झाला आणि मुख्याधिकारी विद्या पोळ या आपल्या सर्व प्रशासकीय कर्मचाऱयांसमवेत बाहेर पडल्या. तद्नंतर होणारी विशेष सभा तहकूब झाली.

    यानंतर नगराध्यक्षा डॉ. प्रतिमा शिंदे, उपनगराध्यक्ष अनील सावंत व सर्व सदस्य सभागृहात बसून होते. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष सावंत यांनी ओडीएफ प्लस’च्या प्रस्तावावर आपली खोटी अन् शिक्क्याचा वापर करुन शहराला हागणदारीमुक्त दर्जा मिळावा, याकरिता ही कृती केली असल्याचे सांगितल्याने पत्रकारही अवाप् झाले. या खळबळजनक आरोपानंतर उपनगराध्यक्ष सावंत यांनी मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा पाढा पत्रकारांसमोर वाचला.

     शहरांतील सार्वजनिक शौचालयांत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना केवळ त्या कागदोपत्री दाखवून हागणदारीमुक्त दर्जा मिळविला असून आपली खोटी सही व शिक्क्याचा वापर केला म्हणून आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले. 

    मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त करुन अनील सावंत म्हणाले, सर्व पदाधिकारी सदस्यांना विश्वासात घेवून त्यांनी ओडीएफ प्लस-प्लसचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसे न करता केवळ एक दिवसाकरिता शौचालयाच्या ठिकाणी आवश्यक असणारे साहित्य भाडय़ाने आणून पहाणी करण्यासाठी येणाऱया समितीला ते दाखविण्यात आले. प्रत्यक्षात शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून सर्व शौचालयांची कायमस्वरुपी डागडुजी व्हावी, अशी नेहमी मागणी करुनही मुख्याधिकारी यांनी ते गांभीर्याने घेतले नाही.

    मुख्याधिकारी आठवडय़ांतून दोनदा कार्यालयात येतात आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे टायपिंग करुन घेतात. त्यांच्या व प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक विकासाची कामे रेंगाळली आहेत. पदाधिकारी व सदस्यांना त्या अपमानास्पद वागणूक देतात. ओडीएफ प्लस-प्लस प्रस्तावावर सह्या करण्यास तीन वेळा विरोध केला होता. केवळ कागदोपत्री काम दाखविण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. सर्वांना विश्वासात घेवून काम करण्याऐवजी त्या मनमानी पध्दतीने वागत आहेत. खोटी सही आणि खोटा शिक्का वापरुन त्यांनी प्रस्ताव पाठवून चुकीच्या पध्दतीने ‘हागणदारीमुक्त शहर’ हा दर्जा मिळविण्याची माहितीही सावंत यांनी दिली.

   घंटागाडीच्या विषयाची चर्चा सभागृहात होणे आवश्यक असताना तसे न करता प्रशासकीय साहित्य खरेदीच्या विषयांत घंटागाडी विषय मंजूर करुन घेतला. सभगृहात चर्चा झाली असती, तर उत्तम दर्जाच्या घंटागाडय़ा घेता आल्या असत्या. घंटागाडय़ांवर बावीस लोकांची नेमणूक केली असून कचरा गोळा करणे, वाहतूक करणे यासाठी तीन लाख खर्च अपेक्षित असताना तो मुख्याधिकाऱयांनी आठ लाखावर नेवून ठेवला आहे. मुख्याधिकारी यांची आजची ही कृती निषेधार्त असून त्यांनी सभागृहाचा अपमान केल्याचे नगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. 

मुध्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना सर्व सदस्यांसह भेटणार असून त्यांच्या या कृती विषयी तक्रार करणार असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले.::

Related posts: