|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अमिताभ बच्चन रेट्रोस्पेक्टिव्हचे कला अकादमीत उद्‌घाटन

अमिताभ बच्चन रेट्रोस्पेक्टिव्हचे कला अकादमीत उद्‌घाटन 

50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या दादासाहेब फाळके ॲवार्ड रेट्रॉस्पेक्टिव्हचे ख्यातनाम चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज गोव्यात पणजी येथील कला अकादमीत उद्‌घाटन केले. अमिताभ बच्चन यांना यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर 50 व्या इफ्फीमध्ये अमिताभ बच्चन रेट्रोस्पेक्टिव्ह आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे सहा सर्वोत्तम चित्रपट वेगवेगळ्या विभागात दाखविण्यात येतील. प्रतिष्ठेच्या या पुरस्काराबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत असल्याचे अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.
इफ्फीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून केंद्र सरकार आणि इफ्फी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या महोत्सवामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या कलाकृती आणि सृजनशीलता अनुभवण्याची संधी मिळते. इफ्फीमध्ये येणाऱ्या प्रतिनिधींच्या संख्येत दरवर्षी वाढ झालेली पहायला मिळते असे त्यांनी सांगितले.
चित्रपट हे वैश्विक माध्यम असून भाषेच्या सीमा ओलांडून जाणारे हे माध्यम असल्याचे ते म्हणाले. चित्रपटगृहात बसल्यानंतर आपण आपल्या शेजारच्या व्यक्तीची जात, पंथ, वर्ण याची विचारणा कधीच करत नाही. एकाच चित्रपटाचा आपण सर्व आनंद घेतो, चित्रपटातल्या विनोदावर एकाचवेळी हसतो आणि भावनिक प्रसंगात एकाच वेळी रडतो.
जगात एकात्मकता साधण्यासाठी चित्रपटासारखी काही मोजकी माध्यमं उरली आहेत, असे सांगून लोकांना जोडणारे चित्रपट निर्माण करणे आपण सुरूच ठेवू अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सृजनशीलतेच्या प्रशंसेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे जग शांततापूर्ण राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे बच्चन म्हणाले. गोव्यात चित्रीकरण झालेल्या आपल्या पहिल्या चित्रपटाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

या रेट्रॉस्पेक्टीव्ह ‘पा’ हा उद्‌घाटनपर चित्रपट असून शोले, दीवार, ब्लॅक, पिकू आणि बदला हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Related posts: