|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडमध्ये पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम राबवणार

कराडमध्ये पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम राबवणार 

प्रतिनिधी / कराड

कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या आराखडय़ाबाबत गुरूवारी नगरपालिकेत स्थायी समिती सदस्य व पोलिसांची बैठक होऊन वाहतूक आराखडय़ावर प्राथमिक चर्चा झाली. यात प्रामुख्याने शहरातील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच वाहतुकीसह कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम राबवण्यावर चर्चा झाली. बैठकीत चर्चा झालेल्या विविध उपाययोजनांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी आठवडाभरात स्थायी समितीची बैठक घेण्यात येऊन आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वाहतूक शाखेचे प्रमुख सतीश पवार, मुख्याधिकारी यशवंत डांगे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती गजेंद्र कांबळे, पाणी पुरवठा सभापती अर्चना ढेकळे, शारदा जाधव, अभियंता ए. आर. पवार यांची उपस्थिती होती.

बैठकीची माहिती देताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी येथील अन्य अडथळे दूर करण्यात येणार आहेत. आय लव्ह कराडच्या आयलॅण्डची लांबी व रूंदी कमी करण्यात येणार आहे. येथील हॉकर्ससाठी वेगळी जागा देण्यात येईल. वडाप व रिक्षांसाठी वेगळी जागा निश्चित करण्यात येणार आहे. शहरातून महामार्गावर जाणाऱया वाहनासाठी दोन मार्ग असून तो एकच करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरून बाहेर जाणाऱया वाहनांसाठी रस्ता मोठा करण्यात येणार आहे. उड्डाण पुलाखाली पार्किंगसह स्वच्छतागृह बांधण्याबरोबरच परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रात रम्बलर स्ट्रीप, ब्लिंकर्स बसवण्यात येणार आहेत.

बसस्थानकाच्या इमारतीत पार्किंगची व्यवस्था असून ती तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. स्थानकासमोर असणाऱया रिक्षा थांब्यांबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. या परिसरातील अतिक्रमणेही हटवण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.

कृष्णा घाटावर रिमोटवर चालणाऱया लहान मुलांच्या गाडय़ांना पूर्णपणे मनाई करण्यात येणार आहे. येथील घोडेस्वारी वाळवंटात नेण्यात येणार आहे. अरूणोदय पान शॉपसमोर रेल्वेगेटच्या धर्तीवर गेट बसवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 ते 10 यावेळेत नो व्हेईकल झोन बागेसमोर करण्यात येणार आहे. पेंढारकर पुतळय़ाच्या मागील भागात पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. अन्य विषयांबाबत कृष्णाबाई ट्रस्टशी चर्चा करण्यात येणार आहे. शहरातील बंद अवस्थेत उभ्या असणाऱया गाडय़ांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जुना कोयना पूल परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱया वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात सीसीटीव्ही बसवण्याबाबत निविदा काढली असून याची संख्या वाढवण्यात येणार आहे. सम विषय पार्किंगचे बोर्ड लावले जातील. यशवंत हायस्कूल व शाळा क्रमांक तीन सुटण्याच्या वेळेबाबत मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यात येईल. कृष्णा पुलावर क्रेन व ट्रफिक वॉर्डनची सोय करून कोंडी दूर करण्यात येणार आहे. वाहतूक आराखडा कायमस्वरूपी तयार करण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका, महामार्ग विभाग, बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वीज वितरण यांची संयुक्त बैठक पुढील आठवडय़ात घेण्यात येईल. वाहतूक विषयक प्राथमिक चर्चा झाली असली तरी सर्व बाबी नागरिकांना विश्वासात घेऊन राबवण्यात येतील. यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पुढील आठवडय़ात विशेष सभा नगरपालिकेत घेण्यात येणार आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीही शहराच्या वाहतुकीचा सर्वंकष आराखडा राबवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. तर पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी बैठक सकारात्मक झाल्याचे सांगत वाहतुकीवर येत्या काळात चांगल्या उपाययोजना होतील, असा विश्वास व्यक्त केला.

काय आहे पी. ए. सिस्टीम

पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम राबवण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात कॅमेरे बसवले असून त्याची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ध्वनीक्षेपकही बसवण्यात येतील. त्याचे नियंत्रण पोलीस उपअधीक्षक कार्यालय किंवा वाहतूक शाखेतून होईल. एखाद्या ठिकाणी वाहन बराचवेळ थांबल्यास त्याला ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्यात येतील. याबरोबरच ठिकठिकाणी चालणाऱया गैरप्रकारांवरही नियंत्रण येणार आहे. सर्व प्रवेशद्वारांवर वाहनांच्या नंबरप्लेट स्पष्टपणे टिपणारे कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.

Related posts: