|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » आमदार हसन मुश्रीफांना हुरहूर; जनतेला केली समजून घेण्याची विनंती

आमदार हसन मुश्रीफांना हुरहूर; जनतेला केली समजून घेण्याची विनंती 

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्तापेचामुळे निकाल लागून एक महिना उलटला तरी जनतेच्या आभाराला जाऊ शकत नसल्याची आणि जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होता येत नसल्याची हुरहुर आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. सत्तापेचामुळे उद्भवलेली ही परिस्थिती समजून घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. तसेच आपल्यावतीने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्य येतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झाले व त्यानंतर 24 ऑक्टोबरला निकाल लागला. पहिल्या आठवड्यात कागल शहर, गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदार संघ व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात मतदारांचा आभार दौरा पूर्ण केला. त्यानंतर महाराष्ट्रात उद्भवलेल्या अभूतपूर्व सत्तापेचामुळे इतर मतदारसंघांमध्ये जाऊन आभार मानता आले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तसेच दरम्यानच्या काळात पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीतच मतभेद झाले आणि या घटनेचा फार मोठा धक्का माझ्यासारख्या पवार कुटुंबावर तीस-पस्तीस वर्षे नितांत प्रेम करणाऱ्या आणि जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्याला बसला. अशा परिस्थितीतही आपण आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यापूर्वीसुद्धा 80 वर्षांचा हा महायोद्धा सबंध महाराष्ट्रभर फिरून जनतेच्या दरबारात आपली भूमिका मांडत होता. त्या भूमिकेलाही सबंध महाराष्ट्राने भरभरून दाद दिली आहे. अशातच ही दुर्दैवी घटना घडली आहे. राज्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आमच्या महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या तीनही पक्षांचे सगळेच आमदार मुंबईत आहेत. या पेचप्रसंगामुळे मलाही मुंबईत राहावं लागतंय, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

दररोज सकाळी अगदी सहा पासून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या जनता आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात रहाणारा व जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात धावून जाणारा मी एक कार्यकर्ता असून मतदार संघातील प्रत्येक गावागावात आभार दौरा कधी होणार याचीच मला हूरहूर लागून राहिली आहे. त्यामुळे माझ्या वतीने माझ्या कुटुंबातील सदस्य येऊन जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतील. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्यावी, अशी मी विनंती मुश्रीफ यांनी केली आहे.

Related posts: