|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » फडणवीस सरकार कोसळले!

फडणवीस सरकार कोसळले! 

देवेंद्र फडणवीस यांचा अवघ्या साडेतीन दिवसात राजीनामा

विश्वासदर्शक ठरावाआधीच मैदान सोडले

सत्तानाटय़ाला निर्णायक वळण

मुंबई / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने राज्यात स्थापन झालेले फडणवीस अल्पजीवी ठरले. अजित पवार यांनी मंगळवारी अनपेक्षित आणि नाटय़मयरित्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. अजितदादांच्या राजीनाम्यामुळे भाजप सरकार अल्पमतात गेले आणि अवघ्या साडेतीन दिवसात कोसळले.

अजित पवारांनी साथ सोडल्याने देवेंद फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठराव्याच्या परीक्षेला सामोरे न जाता त्याआधीच मैदान सोडले. आज भरगच्च पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि लगेच राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजितदादांनी बंड करणे, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवून गनिमी काव्याने भाजपला सरकार बनविण्यास बाध्य करणे आणि साडेतीन दिवसात ते खाली खेचणे या चार दिवसातील थरारक सत्तानाटय़ाची संहिता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लिहिली होती, असे आता बोलले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा आदेश फडणवीस सरकारला दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांनी ‘वर्षा’वर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे फडणवीस यांना सांगितले. अजित पवारांनी साथ सोडल्याने फडणवीस यांनाही राजीनामा देण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यामुळे दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

अजित पवारांनी राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही. कोणाचेही आमदार फोडायचे नाही, घोडेबाजार करायचा नाही ही भाजपची तात्विक भूमिका होती. त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली

यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर जळजळीत टीका केली. शिवसेनेच्या आमदारांनी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेतली. शिवसेनेने सत्तेसाठी मोठी लाचारी पत्करली आणि ही लाचारी त्यांना लखलाभ होवो, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला जनादेश दिला. मात्र, शिवसेनेने त्याचा सन्मान ठेवला नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्ही कुणासोबतही जाऊ शकतो अशी धमकी शिवसेनेने दिली. त्यासाठी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली. जे कधी ‘मातोश्री’च्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या वाडय़ावर जात होते, अशी टीका फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेने बार्गेनिंग पॉवर वाढवली. पहिल्या दिवसापासून पर्याय खुले असल्याची भाषा सुरू झाली. जी गोष्ट ठरलीच नव्हती त्याची मागणी समोर आली. न ठरलेल्या गोष्टीचा शिवसेनेने बाऊ केला’

देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री

सत्तानाटय़ाचा थरार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अजित पवार यांचा राजीनामा

अजितदादांच्या निर्णयाचे विरोधी आघाडीकडून स्वागत

दुसऱया पर्वातील फडणवीस सरकार ठरले अल्पजीवी

Related posts: