|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » तीन चाकांचे सरकार चालणार नाही !

तीन चाकांचे सरकार चालणार नाही ! 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत

सरकार स्वत:च्या ओझ्याखाली दबेल

मुंबई / प्रतिनिधी

नव्या सरकारला आपल्या शुभेच्छा असतील. मात्र, भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांचे नवीन सरकार हे तीन चाकी रिक्षासारखे आहे. ऑटोरिक्षा तीन चाकांवर धावते. तीनही चाके वेगवेगळय़ा बाजूला धावायला लागल्यावर जे होते तीच अवस्था या सरकारची होईल. तीन चाकांचे सरकार चालणार नाही. हे सरकार स्वत:च्याच ओझ्याखाली दबेल, असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्तवले.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या स्थैर्याबाबत शंका उपस्थित केली. ज्यांच्या विचारधारा परस्परविरोधी आहेत असे तीन पक्ष आपला किमान समान कार्यक्रम तयार करत होते. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच त्यांचा कमाल समान कार्यक्रम होता, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना सोबत न आल्याने आम्ही सुरुवातीला सरकार स्थापन करण्यास असमर्थता व्यक्त केली. राज्यपालांनी सत्तेसाठी शिवसेनेला निमंत्रण दिले. बहुमत असल्याचा दावा करणाऱया शिवसेनेला त्यादिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही आणि त्यांनी स्वत:चे हसे करून घेतले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही तीनही पक्षांना आपला कार्यक्रम तयार केला नाही. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी सहकार्य करण्याचे मान्य केल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार स्थापन करताना अजित पवारांनी कोणतीही अट ठेवली नव्हती, असेही फडणवीस म्हणाले.

गेल्या पाच वर्षात जनतेने जो आपल्यावर विश्वास टाकला त्याला पात्र ठरण्याचे काम आम्ही केले. सत्तेत असताना आमचा हेतू कधीच चुकीचा नव्हता. भाजप आता प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम करेल. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोचवून जनतेचा आवाज बनून आम्ही काम करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसोहब दानवे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: