|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 80 टक्के औषधे होणार स्वस्त?

80 टक्के औषधे होणार स्वस्त? 

नफ्याचे प्रमाण 30 टक्के राखण्याच्या प्रस्तावावर सहमती : कर्करोगावरील औषधांचा समावेश

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

आगामी काळात देशवासीयांना महागडय़ा औषधांपासून दिलासा मिळू शकतो. देशांतर्गत औषधनिर्मिती उद्योग तसेच व्यावसायिकांनी किंमत नियंत्रण कक्षेबाहेरील औषधांवरील नफ्याचे प्रमाण (ट्रेड मार्जिन) 30 टक्क्यांपर्यंत राखण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली आहे. या निर्णयामुळे देशात सुमारे 80 टक्के औषधांच्या किमती घटणार आहेत. किंमत नियंत्रक, औषधनिर्मिती उद्योग तसेच त्यांच्या संघटनेदरम्यान झालेल्या शुक्रवारच्या बैठकीत प्रस्तावावर सहमती दर्शविण्यात आली आहे.

इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयडीएमए) अध्यक्ष दीपनाथ रॉय चौध्री यांनी ट्रेड मार्जिनच्या मर्यादेमुळे उद्योगक्षेत्राला कुठलाच त्रास होणार नसल्याचे म्हटले आहे. कर्करोगाच्या औषधांवरही 30 टक्के ट्रेड मार्जिन निर्धारित करण्यात आले आहे. तर हा नियम अन्य उत्पादनांवर लागू करण्यात आल्यास तो कालबद्ध मार्गाने लागू करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले आहे.

कंपन्यांची सहमती

सर्व भारतीय तसेच बहुराष्ट्रीय औषध कंपन्या 30 टक्क्यांच्या नफ्याच्या कमाल मर्यादेशी सहमत असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या या पावलामुळे जेनरिक विभागासह मोठय़ा औषध कंपन्या म्हणजेच सन फार्मा, सिप्ला तसेच ल्युपिनवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या कंपन्यांना एमआरपीत कपात करावी लागणार आहे. ट्रेड मार्जिन 30 टक्के निर्धारित करण्याचा प्रस्ताव ग्राहकांसाठी लाभदायक असून उद्योगक्षेत्रालाही यामुळे चालना मिळणार असल्याचे उद्गार मॅनकाइंड फार्माचे अध्यक्ष आर.सी. जुनेजा यांनी काढले आहेत.

किमतीतील फरक

किंमत नियंत्रण कक्षेच्या बाहेरील औषधांवर 30 टक्के ट्रेड मार्जिन यापूर्वीच प्रचलित आहे. यात रिटेलरचे 20 टक्के आणि होलसेलरचे 10 टक्के मार्जिन असते. याच कारणामुळे नवा प्रस्ताव लागू झाल्याने औषधांच्या किमतीत फार मोठा फरक पडणार नसल्याचे फिलिप कॅपिटलचे फार्माचे ऍनालिस्ट सूर्य पात्रा यांनी म्हटले आहे. 

Related posts: