|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » चौदा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

चौदा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘कार्टोसॅट-3’ या भूमापन उपग्रहासह अन्य 13 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. संस्थेच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी केले गेले. यामुळे इस्रोने पुन्हा एकदा आपली अवकाश क्षमता सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशासाठी संस्थेचे अभिनंदन केले आहे.

या प्रक्षेणाची तयारी संस्थेने गेल्या सहा महिन्यांपासून चालविली होती. कार्टोसॅट हा भारतीय निर्मितीचा भूमापन उपग्रह असून इतर 13 उपग्रह सूक्ष्म आकारमानाचे आहेत. पीएसएलव्ही-सी 47 या अग्निबाणावरून हे उपग्रह आकाशस्थ करण्यात आले. सर्व उपग्रह त्यांच्या पूर्वनिर्धारित कक्षेत पोहचले असून त्यांचे कार्य सुरू झो आहे, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष के. सिवम यांनी या यशस्वी प्रक्षेपणासंबंधी आनंद व्यक्त केला असून संशोधकांचे अभिनंदन केले.

13 छोटे उपग्रह अमेरिकेचे

या प्रक्षेपणात अमेरिकेच्या 13 छोटय़ा उपग्रहांचाही समावेश होता. ते सर्व व्यापारी उपग्रह आहेत. यापैकी 12 उपग्रह फ्लोक-4 पी या प्रकारचे आहेत. अमेरिकेशी झालेल्या भारताच्या करारानुसार इस्रोने त्यांचे प्रक्षेपण केले आहे. त्यांचे वजन 100 किलोपासून 300 किलोपर्यंत आहे. त्यांचे कार्य पृथ्वीचे निरीक्षण हे आहे. तर मेशबेड नावाच्या एका उपग्रहाचे कार्य दूरसंचार क्षेत्रातील आहे. 

कार्टोसॅट-3 हा अत्याधुनिक उपग्रह

पृथ्वीवरील 1 फूट उंचीच्या वस्तूंचेही स्पष्ट छायाचित्र घेण्याची क्षमता या उपग्रहाची आहे. हा तिसऱया पिढीतील अत्याधुनिक उपग्रह असून भारतीय बनावटीचा आहे. त्याचे एकंदर वजन 1 सहस्र 625 किलोग्रॅम असून त्याचा उपयोग नागरी नियोजन, अचूक नकाशे तयार करणे, शहरे किंवा नगरे वसविण्याचे कार्य, ग्रामीण स्रोत आणि पायाभूत सुविधांचा विकास, वनसंपत्तीचे मापन, सागरतटीय भूमीचा उपयोग आणि मापन अशा अत्यंत महत्वाच्या कामांसाठी होणार आहे. त्याचे कार्यायुष्य 5 वर्षांचे असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

बॉक्स

74 वे प्रक्षेपण

इस्रोच्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरचे हे 74 वे प्रक्षेपण असल्याची माहिती देण्यात आली. या 74 प्रक्षेपणांपैकी बहुतेक सर्व यशस्वी झाली आहेत. भारताच्या प्रक्षेपणांच्या यशाचे प्रमाण जगातील इतर प्रगत देशांच्या प्रक्षेपणांपेक्षाही काकणभर सरस आहे, असेही सांगण्यात आले.

बॉक्स

शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा…

ड पीएसएलव्ही सी 47 च्या सुयशामुळे इस्रोचा दबदबा आणखी वाढला

ड चांद्रयान 2 च्या अंशिक यशानंतरची ही पहिलीच यशस्वी अंतराळ झेप

ड कार्टोसॅट 3 हा अत्याधुनिक आणि हाय रेझोल्युशन भूमापन उपग्रह

Related posts: