|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुणे कीर्तन महोत्सवाला मंगळवार पासून प्रारंभ

पुणे कीर्तन महोत्सवाला मंगळवार पासून प्रारंभ 

पुणे / प्रतिनिधी :  

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळाच्यावतीने पुणे कीर्तन महोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ ते ५ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ वाजता  लाल महाल कसबा पेठ येथे महोत्सव होणार असून महोत्सवात देवी देवतांचे स्वयंवर या विषयावर कीर्तन होणार आहे. कीर्तन महोत्सवात दिला जाणारा कीर्तन कोविद ह. भ. प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार यंदा ह.भ.प माऊली महाराज जंगले यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी दिली. 

कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चंदूकाका सराफ अ‍ॅन्ड सन्सचे व्यवस्थापकिय संचालक अतुल शहा, जनसेवा सहकारी बँकचे अध्यक्ष प्रदिप जगताप उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बडोद्याचे कीर्तनकार ह.भ.प संकेतबुवा भोळे रिध्दी सिध्दी स्वयंवर या विषयावर कीर्तन करणार आहेत.    
बुधवार दिनांक ४ डिसेंबर रोजी श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड समूहाचे सुरेश कोते यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी नागपूरचे कीर्तनकार ह.भ.प मोहनबुवा कुबेर पार्वती स्वयंवर या विषयावर कीर्तन करणार आहेत. गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र धर्मसाध्वी ह.भ.प मंगलाताई कांबळे यांच्या हस्ते ह.भ.प माऊलीबुवा जंगले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी पुणे पीपल्स को.  ऑप बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे उपस्थित राहणार आहेत. सिध्देश्वर कुरोलीचे कीर्तनकार ह.भ.प विलासबुवा गरवारे रुकिमणी स्वयंवर या विषयावर यावेळी  कीर्तन करणार आहेत. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.

Related posts: