|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडी नगराध्यक्षांचा राजीनामा

वैभववाडी नगराध्यक्षांचा राजीनामा 

वैयक्तिक कारणास्तव राजीनामा – गजोबार : राजीनामा पक्षीय धोरणानुसार?

प्रतिनिधी / वैभववाडी:

वाभवे वैभववाडीच्या नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सोमवारी त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला. गजोबार यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मात्र पक्षीय ध्येयधोरणानुसार त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, गजोबार यांच्या राजीनाम्यामुळे पुढील नगराध्यक्ष कोण, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगर पंचायतीत सर्व नगरसेवक भाजपकडे आले आहेत. त्यामुळे या नगर पंचायतीत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. नगराध्यक्षपदी सर्वांना संधी मिळावी, या हेतूने गजोबार यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचे बोलले जात आहे.

येथील नगराध्यक्षपद हे इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने दीपा गजोबार यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्या गेली सव्वा वर्ष या पदावर कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सोमवारी त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, उप नगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिवाजी राणे आदी उपस्थित होते.

दरम्यान गजोबार यांच्या राजीनाम्यानंतर पुढील नगराध्यक्षपदाची संधी कोणाला असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी असल्याने अक्षता जैतापकर, मनीषा मसुरकर व समिधा कुडाळकर या तीनही नगरसेविका शर्यतीत आहेत. यातील जैतापकर यांनी यापूर्वी आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे. त्यानंतर मसुरकर यांच्याही नावाची चर्चा आहे.

Related posts: