|Friday, December 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानचे विदेशमंत्री श्रीलंकेच्या दौऱयावर

पाकिस्तानचे विदेशमंत्री श्रीलंकेच्या दौऱयावर 

भारत सतर्क : देशविरोधी कारवाया रोखण्याचे आव्हान

वृत्तसंस्था / कोलंबो

 पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी हे दोन दिवसीय अधिकृत दौऱयानिमित्त श्रीलंकेत पोहोचले आहेत. या दौऱयात कुरैशी हे श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे तसेच विदेशमंत्री दिनेश गनवार्डन यांच्याशी चर्चा करणार आहेत. पाकिस्तानी विदेश मंत्र्यांच्या या दौऱयामुळे भारत सतर्क झाला आहे.

राजनयाच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानी विदेशमंत्र्याचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि चीनचा त्रिकोण भारतासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. श्रीलंकेचे विद्यमान नेतृत्व भारत विरोधासाठी ओळखले जात असल्याने पाक मंत्र्याच्या दौऱयावर भारताचीही नजर आहे.

भारताने दाखविली तत्परता

नव्या राष्ट्रपतींशी संपर्क साधण्यास भारताने अत्यंत तत्परता दाखविली होती. विदेशमंत्री एस. जयशंकर हे गोटाबाया यांना भेटणारे पहिले विदेशी उच्चाधिकारी ठरले होते. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा पत्रासह राष्ट्रपतींना भारत दौऱयाचे निमंत्रण दिले होते. गोटाबाया यांनी हे निमंत्रण स्वीकारून भारताचा दौराही पूर्ण केला आहे.

चीन समर्थक

गोटाबाया यांच्या चीनप्रेमामुळे भारताला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. भारताच्या तीव्र विरोधानंतरही संरक्षण मंत्री या नात्याने गोटाबाया यांनी चिनी युद्धनौकांना कोलंबो बंदरावर थांबण्याची अनुमती प्रदान केली होती. 2014 च्या निवडणुकीतील पराभवाचे खापर महिंदा राजपक्षे यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माथीच फोडले होते.

Related posts: