|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » खर्चाच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट

खर्चाच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट 

कॅगच्या अहवालातून चिंताजनक खुलासा : प्रत्येकी 100 रुपयांच्या उत्पन्नामागे 98.44 रुपयांचा होतोय खर्च

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेचा ऑपरेटिंग रेशियो 2017-18 या आर्थिक वर्षात 98.44 टक्के नोंदविला गेला असून हे प्रमाण मागील 10 वर्षांमधील सर्वात खराब ठरले आहे. नियंत्रक तसेच महालेखापालाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. रेल्वेच्या ऑपरेटिंग रेशियोचा अर्थ प्रत्येकी 100 रुपये कमविण्यासाठी 98.44 रुपये खर्च करण्यात आले आहेत.

भारतीय रेल्वेचा ऑपरेटिंग रेशियो 2017-18 मध्ये 98.44 टक्के राहण्यामागचे मुख्य कारण मागील वर्षी 7.63 टक्के संचालन खर्चाच्या तुलनेत उच्च वृद्धी दर 10.29 टक्के असणे हे आहे. 2008-09 या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशियो 90.48 टक्के इतका होता. 2009-10 मध्ये हे प्रमाण 95.28   टक्के, 2011-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85 टक्के, 2012-13 मध्ये 90.19 टक्के, 2013-14 मध्ये 93.6 टक्के, 2014-15 मध्ये 91.25 टक्के, 2015-16 मध्ये 90.49 टक्के, 2016-17 मध्ये 96.5 टक्के तसेच 2017-18 मध्ये 98.44 टक्के नोंदविण्यात आले आहे.

उत्पन्न वाढविण्याची शिफारस

 अंतर्गत उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मूळ तसेच अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदींवरील निर्भरता कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून पावले उचलली जावीत. चालू आर्थिक वर्षादरम्यान रेल्वेकडून भांडवली खर्चात कपात झाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले गेले आहे.

लक्ष्यपूर्ती नाही

आर्थिक मंदीचा प्रभाव रेल्वेच्या कमाईवरही दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीतून होणारे उत्पन्न निर्धारित लक्ष्यापेक्षा खूपच कमी राहिले आहे. रेल्वेचे एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत उत्पन्न विषयक लक्ष्य 1.20 लाख कोटी रुपये होते, तर रेल्वेचे एकूण उत्पन्न सुमारे 99 हजार कोटी रुपये राहिले आहे. अशाप्रकारे एकूण उत्पन्नात सुमारे 20 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सवलतींचा गैरवापर

सवलती स्वतःच त्यागण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून आले आहे. प्रवासी पासचा गैरवापर तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे सवलतींना मंजुरी देण्याच्या प्रकारात अनियमितता झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

प्रवासी सेवांवर सर्वाधिक खर्च

भारतीय रेल्वे प्रवासी आणि अन्य सेवांकरता येणाऱया खर्चाच्या अनुरुप उत्पन्न प्राप्त करू शकली नसल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. मालवाहतूक सेवेतून होणाऱया कमाईचा 95 टक्के नफा प्रवासी तसेच अन्य सेवांमध्ये होणाऱया नुकसानीच्या भरपाईसाठी वापरला जात आहे. 

निधी खर्च करण्यास अपयश

रेल्वेला मागील दोन वर्षांमध्ये आयबीआर-आयएफ अंतर्गत जमविण्यात आलेला निधी खर्च करता आलेला नाही. भांडवली बाजारातून प्राप्त निधीचा पूर्ण वापर रेल्वेने निर्धारित करावा, असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त उत्पन्न घटल्याने रेल्वेला अर्थसंकल्पीय तरतुदीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

मालवाहतुकीत घसरण

मालवाहतुकीतून सुमारे 18 हजार कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पण मालवाहतुकीच्या उत्पन्नात 4500 कोटी रुपयांची घसरण दिसून आली आहे. याच कालावधीत रेल्वेला मालवाहतुकीतून 13 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Related posts: