|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » चारही नरधमांना जमावाच्या ताब्यात द्या!

चारही नरधमांना जमावाच्या ताब्यात द्या! 

राज्यसभेत जया बच्चन कडाडल्या : इसंसदेच्या दोन्ही सदनामध्ये खडाजंगी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हैदराबादमधील ‘निर्भया 2’ प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोनही सभागृहामध्ये उमटले. राज्यसभेतील समाजवादी पार्टीच्या ज्येष्ठ सदस्या जय बच्चन यांनी या चारही नराधम आरोपींना जमावाच्या ताब्यातच द्यायला हवे, अशा शब्दात या प्रकारची निंदा केली. खरेतर अशा गुन्हेगारांबाबत ‘मॉब लिचिंग’ व्हायला हवे, असे कठोरपणे सांगितले. लोकसभेमध्ये गृहमंत्री राजनाथसिंह यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. सभागृहाने साथ द्यावी, असे आवाहन केले.

आरोपींच्या कुटुंबीयांनीही आरोपींनी केलेला गुन्हा दया दाखवण्यालायक नाही. त्यामुळे त्याना खुशाल गोळय़ा घालाव्यात, असे आरोपी सी. चन्नाकेशवलु याच्या आईने म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर तीन दिवसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हा अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालवला जाईल, असे म्हटले आहे. हा प्रकारच भयंकर असून पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण आणि सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

राज्यसभेमध्ये बोलताना जया बच्चन म्हणाल्या, निर्भया असो वा कठुआ. दोनही प्रकरणे गंभीर आहेत आणि सरकारने यावर निवेदन करावे. ज्या लोकांनी हे घृणास्पद आणि अमानवी कृत्य केले आहे, त्यांना खरेतर जमावाच्या ताब्यात द्यायला हवे. अशा लोकांचे ‘मॉब लिचिंग’ व्हायला हवे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. ज्या पोलीस कर्मचाऱयांनी या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केले अशांची नावे जाहीर करून त्यांना सार्वजनिकदृष्टय़ा अपमानास्पद वागणूक दिली गेली पाहिजे. सरकारने योग्य ती कारवाई करावी. काही देशात ज्याप्रमाणे जनताच अशा आरोपींना शिक्षा देते तसेच आता व्हायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करू

लोकसभेमध्ये गृहराज्यमंत्री राजनाथसिंह यांनी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ही घटना अतिशय दुःखदायक आणि क्लेशमय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. आम्ही लवकरच याविषयी कठोर कायदा आणू. याला सभागृहाने साथ द्यावी, असे आवाहन केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी याविषयी चिंता व्यक्त केली. राज्यसभेतही सभापती वेंकय्या नायडू यांनी समाजाच्या विचारधारेत बदल होण्याची आवश्यकता व्यक्त केली.

खटला द्रुतगती न्यायालयात

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीन दिवसांनंतर या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. हा संपूर्ण खटला द्रुतगती न्यायालयासमोर चालवला जाईल. यातील दोषी पोलीस कर्मचाऱयांना निलंबत केले असून, ही घटना अतिशय हृदयद्रावक असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांना संपूर्ण सुरक्षा आणि सर्वतोपरी मदत देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

आमच्या मुलांना गोळय़ा घाला

आरोपींच्या कुटुंबीयांनी ही घटना त्यांच्यासाठी दुःखदायक आणि धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. आम्ही मुलांची कोणतीही बाजू घेणार नाही. त्यांची आई असलो तरीही त्या मुलीचीही कोणीतरी आई आहेच. तिच्याही संवेदना समजून घेतल्या आहेत. आमच्या मुलांना फाशी द्या किंवा गोळय़ाही घाला. त्यांच्या गुन्हय़ाची त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.

तुरुंगाभोवती कडक बंदोबस्त

चारही आरोपींना चेर्लापल्ली तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात नेत असताना जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे तुरुंग परिसरातही मोठा बंदोबस्त ठेवला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली असली तरी पोलिसांनी सोमवारी नव्याने याचिका दाखल करत पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

अधीर रंजन चौधरींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

निर्मला नव्हे तर निर्बला सीतारमण म्हणायला हवे

दरम्यान, लोकसभेमध्ये कार्पोरेट टॅक्स कमी करण्याविषयी चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने जोरदार गदारोळ झाला. सत्ताधाऱयांनी अधिर रंजन यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, आपल्याला निर्मला नव्हेतर निर्बला सीतारमण म्हणायला हवे. आपण मंत्री आहात, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण कधी कधी तुमची अवस्था अगदीच केवीलवाणी असते. मंत्री म्हणून तुम्हाला जे करायचे असते ते अंमलात आणू शकत नाही. असे का होते त्याची कल्पना नाही, असा खोचक टोला मारला. पण ही वस्तुस्थिती आहे. यावर भाजप सदस्यांनी गोंधळ घालत अधिर रंजन चौधरी यांचा निषेध केला.

Related posts: