|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » यू-19 वर्ल्डकपसाठी प्रियम गर्ग कर्णधार

यू-19 वर्ल्डकपसाठी प्रियम गर्ग कर्णधार 

भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर, जेतेपद कायम राखण्याची भारताची महत्त्वाकांक्षा,

मुंबई / वृत्तसंस्था

पुढील वर्षी होणाऱया 19 वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्गकडे असेल. बीसीसीआयने सोमवारी या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकन भूमीत दि. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे.

रविवारी अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीत संघनिवडीवर शिक्कामोर्तब केले गेले. 19 वर्षीय प्रियम गर्ग हा आघाडीचा फलंदाज असून त्याच्या खात्यावर प्रथमश्रेणीत द्विशतक तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक नोंद आहे.

देवधर चषक स्पर्धेत उपजेतेपद संपादन करणाऱया भारत क संघात त्याचा समावेश राहिला. गत महिन्यात संपन्न झालेल्या या स्पर्धेत त्याने भारत ब संघाविरुद्ध अंतिम लढतीत 74 धावांची तडफदार खेळी साकारली होती. 13 व्या आवृत्तीची यू-19 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी 16 संघात खेळवली जाणार असून 4 गटात प्रत्येकी 4 संघ विभागले गेले आहेत.

भारत अ गटात

भारताचा अ गटात प्रथमच पात्र ठरलेल्या जपान, न्यूझीलंड व व श्रीलंकेसह समावेश आहे. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर लीग फेरीत खेळतील. 19 वर्षाखालील वयोगटातील या स्पर्धेत भारत आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला असून आतापर्यंत भारताने 4 वेळा विश्वचषक पटकावला आहे. 2018 मधील मागील आवृत्तीत भारताने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून चीत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि त्या स्पर्धेत ते अपराजितही राहिले.

दरम्यान, पुढील वर्षातील विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर हा युवा संघ दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणार असून तेथे आफ्रिका यू-19 संघाविरुद्ध तीन वनडे खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका यू-19, भारत यू-19, झिम्बाब्वे यू-19 व न्यूझीलंड यू-19 या संघांत चौरंगी स्पर्धा आयोजित केली गेली आहे. दक्षिण आफ्रिका दौरा व चौरंगी स्पर्धेसाठी भारतीय युवा संघात हैदराबादच्या सीटीएल रक्षण या अतिरिक्त खेळाडूचा समावेश असणार आहे.

यू-19 विश्वचषकासाठी भारतीय संघ : प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रूव चंद जुरेल (उपकर्णधार-यष्टीरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.

दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी यू-19 भारतीय संघ : प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रूव चंद जुरेल (उपकर्णधार व यष्टीरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, सीटीएल रक्षण.

Related posts: