|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी मालिकाविजय

ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी मालिकाविजय 

यजमान संघ 2-0 फरकाने विजयी, दुसऱया कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा डावाने धुव्वा,

पाकिस्तान ऑस्ट्रेलियन भूमीत सलग 14 व्या कसोटीत पराभूत

ऍडलेड / वृत्तसंस्था

स्पिन किंग नॅथन लियॉनने धोकादायक अर्धशतकवीर शान मसूद व असद शफीक यांच्यासह डावात 5 बळी घेतल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दुसऱया व शेवटच्या कसोटीत डावाने धुव्वा उडवला आणि 2 कसोटी सामन्यांची ही मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 589 धावांचा डोंगर रचल्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर फॉलोऑन लादत त्यांचा दुसरा डावही 239 धावांवर खुर्दा करत ही कसोटी एक डाव व 48 धावांच्या फरकाने जिंकली.

पाकिस्तानने सोमवारी या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला 3 बाद 39 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली, त्यावेळी मसूद (14) व शफीक (8) या भरवशाच्या फलंदाजांवरच त्यांची शेवटची मदार होती. या जोडीने अपेक्षेप्रमाणे प्रतिकारात्मक खेळ साकारत आपला लढा सुरु केला मात्र, ऑस्ट्रेलियाला दुसऱया डावात फलंदाजी करण्यासाठी भाग पाडावे, सलग दुसऱयांदा डावाने पराभवाची नामुष्की टाळावी, यासाठी पाकिस्तानला 248 धावांची गरज होती. पण, प्रत्यक्षात ते 239 धावांपर्यंतच मजल मारु शकले.

गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरुपाच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सलग सहावा विजय ठरला. यापैकी चार विजय त्यांनी ऍडलेडवरच मिळवले आहेत. 2015 पासून दिवस-रात्र कसोटी सामन्यांना सुरुवात झाली असून आतापर्यंत ऑस्ट्रेलियानेच यात सर्वाधिक वरचष्मा गाजवला आहे.

लियॉनच्या भेदकतेसमोर दाणादाण

वास्तविक, खेळपट्टीची गोलंदाजांना काहीही मदत नव्हती. पण, तरीही अनुभवी फिरकीपटू लियॉनने 69 धावात 5 बळी घेत आपल्या फिरकी गोलंदाजीचा चांगलाच वरचष्मा गाजवला. त्याने सूत्रे हाती घेण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे जलद गोलंदाज मात्र त्या तुलनेत बरेच झगडत राहिले. लियॉनने डावात 5 व त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची ही कारकिर्दीतील एकूण 16 वी वेळ ठरली. पाकिस्तानविरुद्ध मात्र त्याने प्रथमच असा पराक्रम केला. पाकिस्तानचा संघ या वर्षात एकूणच अतिशय खराब फॉर्ममध्ये असून या वर्षात त्यांनी खेळलेले चारही कसोटी सामने हरले आहेत. यात जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यातील पराभवाचा समावेश आहे.

पाकिस्तान ऑस्ट्रेलियात अपयशीच

या पराभवामुळे पाकिस्तानची ऑस्ट्रेलियन भूमीतील अपयशी मालिका देखील कायमच राहिली. पाकिस्तानला आता ऑस्ट्रेलियन भूमीत सलग 14 व्यांदा कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

रविवारी बाबर आझम व कर्णधार अझहर अली स्वस्तात बाद झाल्यानंतर मसूद व असद यांनीच बऱयापैकी प्रतिकार केला. मसूदसाठी 17 व्या कसोटीतील हे सहावे अर्धशतक ठरले. लियॉनने त्याची खेळी मिशेल स्टार्ककरवी संपुष्टात आणली. आतापर्यंत 12 कसोटी शतके फटकावलेल्या शफीकने जोश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत 25 वे अर्धशतक साजरे केले. पण, त्यालाही लियॉननेच बाद केले. त्याने किंचीत उसळलेल्या एका चेंडूवर वॉर्नरकडे 57 धावांवर असताना झेल दिला.

लियॉनसाठी शाहीन पाचवा बळी

लियॉनने नंतर इफ्तिकार अहमदला शॉर्ट लेगवर लॅब्युशानेकरवी झेलबाद करवले. याशिवाय, पहिल्या डावातील शतकवीर यासीर शाहला 13 धावांवर पायचीत केले. शाहीद आफ्रिदी हा लियॉनचा पाचवा बळी ठरला. उपाहारापूर्वी शेवटच्या चेंडूवर त्याने मिडऑफवरील हॅझलवूडकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. नवा गुलाबी चेंडू घेतला गेल्यानंतर पाकिस्तानचे शेवटचे काही फलंदाज लागोपाठ बाद होण्यासाठी फारसा अवधी लागला नाही.

हॅझलवूडने मोहम्मद रिझवानला 45 धावांवर बाद केले तर मोहम्मद अब्बास धावचीत झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यातही पाकिस्तानच्या अननुभवी गोलंदाजीची अक्षरशः लक्तरे काढली आणि इथेच त्यांच्या विजयाचा भक्कम पाया रोवला गेला. डेव्हिड वॉर्नरने 335 धावांची नाबाद, त्रिशतकी खेळी साकारली, येथे त्यांनी आपला वरचष्मा गाजवणे निश्चित असल्याची प्रचिती दिली होती.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 3-589 घोषित.

पाकिस्तान पहिला डाव : सर्वबाद 302

पाकिस्तान दुसरा डाव : 82 षटकात सर्वबाद 239. (फॉलोऑन) (शान मसूद 127 चेंडूत 8 चौकारांसह 68, असद शफीक 112 चेंडूत 5 चौकारांसह 57, मोहम्मद रिझवान 103 चेंडूत 4 चौकारांसह 45. अवांतर 6. नॅथन लियॉन 25 षटकात 7 निर्धाव, 69 धावात 5 बळी, जोश हॅझलवूड 23 षटकात 4 निर्धाव, 69 धावात 3 बळी, मिशेल स्टार्क 1-47).

Related posts: