|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण उपनगराध्यक्ष-नगरसेवक भिडले!

चिपळूण उपनगराध्यक्ष-नगरसेवक भिडले! 

नगर परिषदेतच घडलेल्या प्रकाराने नागरिक अवाप्

प्रतिनिधी/ चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावरून उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने व नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यात सोमवारी नगर परिषदेतच जोरदार वाद झाला. ‘नडायचे असेल तर समोरासमोर नडुया, कोणाच्यात किती दम आहे ते बघू’ असे आव्हान दोघांनीही एकमेकांना दिल्याने खळबळ उडाली. सभागृह ते तळमजल्यापर्यंत रंगलेला हा वाद हातगाईपर्यंत गेला. मात्र नागरिकांनी मध्यस्थी केल्याने तो शमला. त्यामुळे पुढील घटना घडली नाही.

काही नागरिक चौपदरीकरणाबाबत असलेल्या आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन नगर परिषदेत गेले होते. त्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व अधिकारी आपापल्या कक्षात गेले. मात्र भोजने, मोदी, नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू यांच्यासह काही नागरिक सभागृहात होते. याचवेळी मोदी यांनी ‘काही दिवसांपूर्वी नगर परिषदेची मुंबईत बैठक झाली आणि त्यामुळेच जलवाहिनीची 2 मीटर जागाही या कामात जात असून यामुळे नागरिकांचे नुकसान होणार आहे’ असा आरोप केला. यावर भोजने यांनी ‘तोंडात येईल ते काहीही बोलू नको, बैठकीमुळे काहीही झालेले नाही’ असे सांगितले.

यावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाला. ‘मोदी तू मला काय सांगतोस, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अभ्यास करून मी दमलोय, माझी जागाही यात जात आहे. त्यामुळे स्वार्थासाठी नागरिकांना भडकवू नकोस, चौपदरीकरणाचा आराखडा तयार झाला तेव्हा तुमच्या पक्षाचे खासदार, आमदार झोपले होते का, असा सवाल भोजने यांनी केला. यावर मोदी आणखीनच भडकले. खासदार, आमदारांचे बोलायचे नाही. तुमचे सरकार होते. तेव्हा मंत्री झोपले होते का,’ असा सवाल केला. यावरून वाद आणखीनच चिघळला. त्यानंतर ‘तुला नडायचे असल्यास समोरासमोर नड, अशी वावटळ आणू नको’ असे भोजने यांनी सुनावताच ‘मीही नडू शकतो, नागरिकांना तुम्ही अपशब्द उच्चारता. हे योग्य नाही, त्यांचे नुकसान होणार आहे म्हणून ते आले आहेत, मी त्यांना आणलेले नाही’ असे मोदी यांनी स्पष्ट केले.

  सुमारे अर्धा तास रंगलेला हा वाद तळमजल्यावर गेल्यावर हातगाईवर आला. मात्र येथे असलेल्या नागरिकांनी दोघांनाही शांत केले. त्यानंतर हा वाद मिटला. मात्र भर नगर परिषदेत झालेला हा वाद अनेकांचे मनोरंजन करणारा आणि दोन सुशिक्षित लोकप्रतिनिधी ज्यांना नागरिकांनी प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवले आहे, त्यांचा सुशिक्षितपणा यावेळी विचार करायला लावणारा ठरला. त्यामुळे या वादाची दिवसभर नगर परिषदेसह शहरात चर्चा सुरू होती.

लोकांना भडकवण्याचा प्रयत्न: भोजने

 या बाबत ‘तरूण भारत’शी बोलताना भोजने म्हणाले की, आम्ही मुंबईत बैठक करून आल्यावर काही तरी चांगले बदल होताहेत याचे मोदी यांना वाईट वाटत असून आता आपल्याला श्रेय कसे मिळणार, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना उलटसुलट माहिती देऊन भडकवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. खोटे बोलणे हा त्यांचा स्वभावच असून त्यातूनच ते नौटंकी करून नागरिकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात तसे कोणतेही पत्र येथील अधिकाऱयांना आलेले नाही.

सत्ताधाऱयांमुळे नागरिकांचे नुकसान: मोदी

यावर बोलताना मोदी म्हणाले की, सत्ताधाऱयांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीमुळे नागरिकांचा कोणताही फायदा झालेला नसून उलट नुकसानच झाले आहे. त्यामुळे आमचा त्यास कायमचा विरोध आहे. आपण स्वार्थासाठी भांडत नसून नागरिकांच्या हितासाठी आपला लढा आहे आणि तो नागरिकांच्या मदतीनेच यशस्वी करू. या बैठकीनंतर जलवाहिनीची 2 मीटरची जागाही चौपदरीकरणात जात असून ते नागरिकांसाठी अडचणीचे आहे.

कोणतेही पत्र आलेले नाही: मराठे

दरम्यान, या बाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे शाखा अभियंता आर. आर. मराठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौपदरीकरणाच्या कामाबाबतचे नव्याने कोणतेही पत्र या कार्यालयाकडे आलेले नसून नेहमीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयातून काही सूचना येथील अधिकाऱयांना दररोजच येत असतात आणि त्या सूचना ठेकेदारांना दिल्या जातात, असे स्पष्ट केले.

Related posts: